आयपीएलमध्ये सोमवारी रात्री झालेल्या अत्यंत रोमांचक लढतीत दिल्ली कॅपिटल्सने लखनौ सुपरजायंट्सवर एक विकेट राखून मात केली. अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात आशुतोष शर्मा याने जिगरबाज खेळी करत दिल्ली कॅपिटल्सला सनसनाटी विजय मिळवून दिला. ३१ चेंडूत नाबाद ६६ धावांची वादळी खेळी करणारा आशुतोष या सामन्यातील सामनावीर ठरला.
या लढतीमध्ये लखनौ सुपरजायंट्सने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना २०९ धावांचा डोंगर उभा केला होता. त्यानंतर २१० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीची सुरुवात कमालीची अडखळती झाली होती. अवघ्या ७ धावांत त्यांचे तीन फलंदाज बाद झाले. तर ६५ धावांवर निम्मा संघ माघारी परतला होता.
दिल्लीची अवस्था ६ बाद ११३ अशी झाली असताना फलंदाजीस आलेल्या विपराज निगम (१५ चेंडूत ३९ धावा) आणि आशुतोष शर्मा यांनी सातव्या विकेटसाठी २२ चेंडूत ५५ धावा जोडत सामन्यात रंगत आणली. तर विपराज बाद झाल्यानंतर आशुतोषने फलंदाजीची सर्व सूत्रे आपल्या हाती घेत दिल्लीला एक अविस्मरणीय विजय मिळवून दिला.
शेवटच्या तीन षटकांचा थरारदरम्यान, या सामन्यातील खरा थरार रंगला तो शेवटच्या ३ षटकांमध्ये. विपराज निगम बाद झाल्यावर दिल्लीला शेवटच्या १८ चेंडूत ३९ धावांची गरज होती. तर हातात केवळ ३ गडी होती. दरम्यान, १८ व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर मिचेल स्टार्क बाद झाला. त्यानंतर कुलदीप यादव याने तिसऱ्या चेंडूवर एक धाव घेत आशुतोषला स्ट्राईक दिली. याच क्षणी आशुतोषने फलंदाजीचा पाचवा गिअर टाकत शेवटच्या ३ चेंडूत १६ धावा कुटून काढल्या.
आता शेवटच्या दोन षटकांमध्ये १२ चेंडू आणि २२ धावा असं समीकरण होतं. तर दिल्लीच्या हाती केवळ दोन विकेट्स होते. प्रिंस यादवने टाकलेल्या या षटकातील पहिल्याच चेंडूवर कुलदीपने चौकार ठोकला. मात्र दुसऱ्या चेंडूवर कुलदीपला धाव घेता आली नाही. तिसऱ्या चेंडूवर तो धावबाद झाला. षटकातील चौथ्या चेंडूवर आशुतोष शर्माने २ धावा काढल्या. तर शेवटच्या २ चेंडूंवर चौकार आणि षटकार ठोकत त्याने सामना दिल्लीच्या अवाक्यात आणला.
शेवटी अखेरच्या ६ चेंडूत दिल्लीला ६ धावांची गरज होती. तर अखेरचा एक विकेट हाती होता. लखनौचा कर्णधार रिषभ पंतने शाहबाज अहमदच्या हाती चेंडू दिला. दरम्यान, पहिल्या चेंडूवर मोहित शर्माला धाव घेता आली नाही. दुसऱ्या चेंडूवर त्याने एक धाव घेतली. तर तिसऱ्या चेंडूवर आशुतोषने खणखणीत षटकार ठोकत दिल्लीच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.