आयपीएलच्या यंदाच्या हंगामात गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्सचा जेतेपदाचा चौकार मारण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. २२ मार्चला पहिल्या सामन्यात घरच्या मैदानावर ते रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्धच्या लढतीनं यंदाच्या हंगामाची सुरुवात करेल. पुन्हा ही स्पर्धा गाजवण्यासाठी शाहरुखच्या मालकीच्या संघानं अजिंक्य रहाणेवर नेतृत्वाचा मोठा डाव खेळला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
RCB च्या ताफ्यातही सुरु असेल KKR च्या या खेळाडूची चर्चा
स्वस्तात मस्त कर्णधाराच्या नेतृत्वाखाली जेतेपद कायम राखण्यासाठी कोलकाताच्या संघानंही तगडी संघ बांधणी केलीये. कोलकाताच्या ताफ्यात अनेक हिरो आहेत. त्यात सर्वात आघाडीवर असणारे नाव सलामीच्या लढतीतही लक्षवेधी ठरेल. फक्त कोलकाता नाईट रायडर्सच्या चाहत्यांमध्येच नाही तर RCB च्या ताफ्यातही कदाचित याच खेळाडूची चर्चा सुरु असेल. ते नाव म्हणजे वरुण चक्रवर्ती.
नॅशनल ड्युटी निभावली, आता फ्रँचायझीला चॅम्पियन करण्याची जबाबदारी
आयपीएलमधील दमदार कामगिरीच्या जोरावर टीम इंडियात एन्ट्री मारणारा अन् चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत आपल्या फिरकीची जोरावर भारतीय संघाला विक्रमी विजय मिळवून देण्यात वरुण चक्रवर्तीनं मोलाची कामगिरी बजावली होती. याच कामगिरीमुळे तो सलामीच्या लढतीत सर्वात आघाडीवर असणारा चेहरा ठरतो. दोन्ही संघात तो सर्वोत्तम कामगिरी करणारा खेळाडू ठरला तर नवल वाटणार नाही. कोलकाता संघाला पुन्हा चॅम्पियन करण्याची मोठी जबाबदारी त्याच्यावर आहे. जाणून घेऊयात तो सर्वात आघाडीवर असण्यामागची कारणं
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत मोजक्या सामन्यात गोल्डन बॉलच्या शर्यतीत होता वरुण
आयपीएल आधी वरुण चक्रवर्तीनं चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत आपल्या फिरकीचा जलवा दाखवून दिला आहे. अगदी शेवटच्या टप्प्यात मिळालेले दुबईच तिकीट आणि पहिल्याच सामन्यात पंजा मारून त्यानं व्हाइट बॉल चेंडूवर प्रतिस्पर्धी ताफ्यातील खेळाडूंच्या गठ्ठ्यानं विकेट्स घेण्याचा ट्रेंड कायम ठेवल्याचे पाहायला मिळाले. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत फक्त ३ सामन्यात त्याने ९ विकेट्स घेतल्या. सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो दुसऱ्या स्थानावर राहिला. गोल्डन बॉल जिंकण्याची संधी अवघ्या एका विकेट्सनं हुकली. त्याची ही कामगिरी आयपीएलमध्येही त्याच्यासाठी जमेची बाजू ठरू शकते. आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्वोच्च कामगिरीनंतर तो फ्रँचायझी क्रिकेटमध्येही अधिक घातक ठरू शकतो.
इंग्लंड विरुद्धच्या टी-२० मालिकेतही सोडली छाप
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेआधी वरुण चक्रवर्तीनं घरच्या मैदानात रंगलेल्या इंग्लंड विरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतही आपल्या फिरकीची जादू दाखवून दिली होती. सातत्याने तो विकेट्स घेताना दिसतोय. त्याचे चक्रव्यूव्ह भेदणं हे भल्या भल्या फलंदाजांसाठी आव्हानात्मक आहे. आयपीएलमध्ये तो विराट कोहलीसह त्याच्या संघातील तगड्या बॅटरसाठी डोकेदुखी ठरू शकतो.
वरुण चक्रवर्तीची आयपीएलमधील कामगिरी
वरुण चक्रवर्ती आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासात ७१ सामन्यात ८३ विकेट्स नोंदवल्या आहेत. ६ हंगामात त्याने चार वेळा विकेट्सचा दुहेरी आकडा गाठलाय. २०२० च्या हंगामात १७ विकेट्स, २०२१ मध्ये १८ विकेट्स आणि २०२३ आणि २०२४ च्या हंगामात अनुक्रमे त्याने २० आणि २१ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्याचे पाहायला मिळाले होते. सध्याच्या घडीला तो यशाच्या शिखरावर आहे. त्यामुळेच तो कोलकातासाठी हुकमी एक्का तर प्रतिस्पर्धी संघासाठी एक मोठं आव्हान ठरू शकतो.
कोलकाता नाईट रायडर्स संभाव्य प्लेइंग इलेव्हन- क्विंटन डिकॉक, सुनील नरेन, अजिंक्य रहाणे (कर्णधार), व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंह, आंद्रे रसेल, रमनदीप सिंह, हर्षित राणा, स्पेंसर जॉनसन, वैभव अरोडा, वरुण चक्रवर्ती.