Join us

'ऑपरेशन सिंदूर'नंतर KKR vs CSK सामन्याआधी वाजलं राष्ट्रगीत; कारण...

भारतीय जवानांना सलाम करण्यासाठी ईडन गार्डवर वाजलं राष्ट्रगीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 19:51 IST

Open in App

आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील ५७ व्या सामन्यासाठी कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज हे दोन संघ ईडन गार्डन्सच्या मैदानात उतरले आहेत. कोलकाता नाईट रायडर्स संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणे याने टॉस जिंकून या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्याला सुरुवात होण्याआधी ईडन गार्डन्सच्या मैदानात दोन्ही संघांनी राष्ट्रगीतासाठी एकत्रित उभा राहिल्याचे पाहायला मिळाले. ईडन गार्डन्सच्या मैदानात खेळाडू आणि प्रेक्षकांनी राष्ट्रगीतासह पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवादी तळे उद्धस्त करणाऱ्या जवानांना सलाम केल्याचे पाहायला मिळाले. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!राष्ट्रगीत सुरु असताना झळकला खास संदेश

राष्ट्रगीत सुरु असताना स्क्रीनवर  "भारतीय सशस्त्र दलाचा अभिमान आहे." असा खास फलकही झळकल्याचे पाहायला मिळाले. ही गोष्ट ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय सैन्याच्या यशस्वी कारवाईला सलाम करण्याचा हेतू आणि भारतीय सैन्याबद्दलची अभिमानास्पद भावना व्यक्त करणारी होती.  पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर १५ दिवसांत भारताने केलेल्या कारवाईवर अनेक प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे. त्यात आता आयपीएल सामन्यावेळी खेळाडू आणि सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थितीत असलेल्या प्रेक्षकांनी देशभक्तीची भावना  जपल्याचे पाहायला मिळाले. ईडन गार्डन्सच्या मैदानातून सशस्त्र दलांना सेल्यूट करण्यात आला.  

कोलकातासाठी हा सामना आहे खूप महत्त्वाचा

सामन्याबद्दल बोलायचं तर चेन्नई सुपर किंग्जचा संघ स्पर्धेतून आधीच आउट झाला आहे. दुसरीकडे कोलकाता संघाचे आव्हान अजूनही टिकून आहे. घरच्या मैदानातील सामना जिंकून  प्लेऑफ्सच्या दिशेनं आणखी एक पाऊल पुढे टाकण्याच्या इराद्याने ते मैदानात उतरले आहेत. पहिल्यांदा फलंदाजी करताना ते किती टार्गेट सेट करणार? चेन्नईला रोखून ते आपल्या आशा पल्लवित ठेवणार का? ते पाहण्याजोगे असेल.

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५कोलकाता नाईट रायडर्सचेन्नई सुपर किंग्सइंडियन प्रीमिअर लीग