आयपीएल २०२५ स्पर्धेतील ४८ व्या सामन्यानंतर दिल्ली कॅपिटल्सचा फिरकीपटू कुलदीप यादव याने नाईट रायडर्सच्या संघातून खेळणाऱ्या रिंकू सिंह याला भर मैदानात कानफाडीत मारल्याची गोष्ट चर्चेत आली. दोघांचा मैदानातील व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला. यावर अनेक प्रतिक्रिया उमटल्याचे पाहायला मिळाले. सोशल मीडियावर या घटनेसंदर्भात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत असताना आता मैदानात जे घडलं त्यामागची खरी स्टोरी समोर आली आहे.
अनेकांना आठवले श्रीसंत-हरभजन सिंग प्रकरण
कुलदीप यादव आणि रिंकू सिंह यांच्यातील व्हायरल व्हिडिओ पाहिल्यावर अनेकांना आयपीएलच्या पहिल्या हंगामात एस. श्रीसंत आणि हरभजन सिंग यांच्यात घडलेला प्रकारही आठवला. २००८ च्या हंगामात भज्जीनं युवा श्रीसंतच्या भर मैदानात 'थप्पड' मारली होती. कुलदीप-रिंकू यांच्यातही असाच प्रकार घडल्याचे बोलले गेले. पण ती एक अफावच निघाली. कोलकाता नाईट रायडर्सच्या संघानं एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून पडद्यामागची खरी गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर
जय-वीरुचा दाखला देत KKR नं शेअर केली कुलदीप-रिंकूची दोस्तीची स्टोरी
कोलकाता नाईट रायडर्सच्या अधिकृत एक्स अकाउंटवरून एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. कुलदीप यादव आणि रिंकू सिंह यांच्यात भांडण झाल्याच्या गोष्टीत कोणतेही तथ्य नाही, हेच या व्हिडिओतून स्पष्ट करण्यात आले आहे. मैदानात जे घडलं ते दोघांच्यातील वाद नव्हे तर दोन जीवलग मित्रांमधील खास बॉन्डिंगचा भाग होता. याचा पुरवाच KKR दिल्याचे दिसते. हिंदी सिनेसृष्टीतील मैत्रीवर भाष्य करणारी आजरामर कलाकृती ठरलेल्या 'शोले' चित्रपटातील "ये दोस्ती हम नहीं तोडेंगे..." हे लोकप्रिय गाणं वाजवत कोलकाता नाईट रायडर्सच्या संघानं उत्तर प्रदेशमधील दोन्ही क्रिकेटर्सच्या दोस्तीची स्टोरी शेअर केली आहे.