Ishant Sharma Fined by BCCI, IPL 2025 SRH vs GT: धडाकेबाज फलंदाजांचा संघ अशी ओळख असलेल्या सनरायझर्स हैदराबादला रविवारी गुजरात टायटन्सने पराभवाचे पाणी पाजले. गुजरातने १७व्या षटकातच ७ विकेट्सने सामना जिंकला आणि गुणतालिकेत दुसरा नंबर पटकावला. हैदराबादने नितीश कुमार रेड्डीच्या सर्वाधिक ३१ धावांच्या बळावर अडखळत १५२ धावा केल्या. गुजरातने कर्णधार शुबमन गिलच्या ६१ धावांच्या जोरावर झटपट सामना जिंकला. गुजरात संघाकडून इशांत शर्मा इमॅक्ट गोलंदाज म्हणून आला होता. तो गोलंदाजीत फारशी चमक दाखवू शकला नाही. उलट इशांत शर्मा हा गुजरात टायटन्ससाठी सर्वात महागडा गोलंदाज ठरला. त्याने ४ षटकांत ५३ धावा दिल्या आणि त्याला एकही विकेट मिळाली नाही. त्यातच दुष्काळात तेरावा महिना म्हणून, इशांत शर्माला मैदानावरील एका घटनेसाठी BCCI कडून शिक्षाही झाली.
इशांत शर्माने काय केले?
सामन्यादरम्यान इशांत शर्माला नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले. तथापि, आयपीएलने जारी केलेल्या प्रेस रिलीजमध्ये या घटनेचा स्पष्ट उल्लेख नाही. त्यात फक्त एवढेच म्हटले होते की इशांतने त्याचा गुन्हा कबूल केला आहे. त्याला लेव्हल १ चा दोषी आढळला आहे. इशांतने त्याची चूक मान्य केल्यामुळे, यावर पुढील सुनावणी होणार नाही. आयपीएल नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल त्याला दोषी ठरवले गेले आणि सामन्याच्या मानधनातील २५ टक्के रक्कम त्याला दंड म्हणून ठोठवण्यात आली. आयपीएलने जारी केलेल्या प्रेस रिलीजमध्ये म्हटले आहे की, इशांतने त्याचा गुन्हा कबूल केला आहे. तो लेव्हल १ चा दोषी आढळला आहे. इशांतने त्याची चूक मान्य केली असून त्यावर सामनाधिकारी यांच्यापुढ्यात सुनावणी झाली आहे. IPL आचारसंहितेतील कलम २.२ अंतर्गत इशांत शर्माला दोषी ठरवण्यात आले आहे. मैदानावरील तयाची वागणूक अयोग्य असल्याने त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
इशांत शर्मा हा २००८ पासून IPL मध्ये खेळतो आहे. गुजरात टायटन्स हा त्याचा सातवा संघ आहे. त्याने आयपीएल २०२५ मध्ये गुजरात टायटन्सकडून आतापर्यंत ३ सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने फक्त १ विकेट घेतली आहे. एकूण IPL मध्येही त्याने आतापर्यंत ११३ सामने खेळले आहेत आणि ९३ विकेट्स घेतल्या आहेत. आगामी काळात इशांत शर्माला कामगिरी सुधारावी लागेल, अन्यथा त्याला संघाबाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो.