रोहित नाईक
Suyansh Shendge IPL 2025 : लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : 'आयपीएलमध्ये इम्पॅक्ट प्लेयर नियमाबाबत अनेकांनी मत व्यक्त केले. माझ्यामते हा केवळ एक नियम आहे आणि याद्वारे प्रत्येक संघ एक अतिरिक्त फलंदाज किंवा गोलंदाज खेळवू शकतात. याकडे यादृष्टीने पाहिल्यास काहीच अडचण येणार नाही,' असे पंजाब संघातील मुंबईकर अष्टपैलू सूर्यांश शेडगे याने म्हटले. आयपीएलमध्ये पहिल्यांदाच खेळत असलेल्या सूर्यांशने 'लोकमत'शी विशेष संवाद साधला.
सूर्यांशने २५ मार्चला गुजरात संघाविरुद्ध आयपीएल पदार्पण केले. पंजाबने हा सामना ११ धावांनी जिंकला होता, पण सूर्याशला या लढतीत फलंदाजी व गोलंदाजीची संधी मिळाली नव्हती. सूर्यांश म्हणाला, "मी माझ्या वडिलांच्या वाढदिवसाच्या दिवशी आयपीएल पदार्पण केले. शिवाय त्यावेळी माझे कुटुंबीय स्टेडियममध्ये उपस्थित होते. त्यामुळे हा माझ्यासाठी खूप मोठा क्षण होता. मला गोलंदाजी, फलंदाजीची संधी मिळाली नाही. पण, तरीही मी माझे सर्वोत्तम योगदान देण्याचा प्रयत्न केला. प्रशिक्षक रिकी पॉटिंग सांगतात नेहमी की, क्षेत्ररक्षण प्रत्येक दिवशी महत्त्वाचे ठरते. एखाद दिवस फलंदाजी किंवा गोलंदाजी चालणार नाही, पण क्षेत्ररक्षणामध्ये तुम्ही कायम संघासाठी मोलाचे योगदान देऊ शकतात. हीच गोष्ट मी लक्षात ठेवली होती.
इम्पॅक्ट प्लेयर नियमाबाबत सूर्याश म्हणाला की, 'या नियमाद्वारे केवळ एक अतिरिक्त गोलंदाज किंवा फलंदाज खेळवता येतो आणि प्रत्येक संघाने याकडे याच दृष्टीने पाहिले पाहिजे. जर तुम्ही एक परिपूर्ण अष्टपैलू असाल, तर नक्कीच संघात स्थान मिळेल. जर मी चांगला खेळलो, तर संघातील स्थान डगमगणार नाही. याच विचाराने मी खेळतो."
'प्रत्येक खेळाडूची प्रक्रिया वेगळी'
सूर्यांश म्हणाला, "श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात याआधीही मी खेळलोय. त्याला संघाकडून काय अपेक्षित आहे, याची जाणीव आहे. शिवाय शशांक सिंगच्या खेळाद्वारे शिकण्याचा प्रयत्न करतो. आमची भूमिका जवळपास एकसारखीच आहे. त्याने फिनिशर म्हणून स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. प्रत्येक खेळाडूची प्रक्रिया वेगळी असते आणि हीच खेळाची सुंदरता आहे. त्यामुळेच देशी आणि विदेशी खेळाडूंच्या मिश्रणाचा फायदा मिळतो. ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टोइनिस यांच्याकडूनही खेळाचे बारकावे शिकण्याची संधी मिळत आहे."