भारताचे महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर हे सामन्यांच्या समालोचनावेळी त्यांच्या क्रिकेटमधील सखोल ज्ञान आणि परखड विधानांमुळे नेहमीच चर्चेत असतात. सोबतच सुनील गावस्कर यांच्या मिश्किल स्वभावाचा प्रत्ययही वारंवार येत असतो. असाच गमतीदार प्रसंगा आयपीएलच्या एका सामन्यादरम्यान, घडला. सुनील गावस्कर आणि मयंती लँगर यांच्या कपड्यांच्या कॉम्बिनेशनवरून सोशल मीडियावर होणारे मीम्स तुम्ही अनेकदा पाहिले असतील. त्यावरूनच आज गावस्कर यांनी ही मिश्किल टिप्पणी केली.
त्याचं झालं असं की, आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामन्यादरम्यान, सुनील गावस्कर हे मैदानावर होते आणि मयंती लँगर आणि माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पा हे स्टुडियोमध्ये होते. सामना सुरू होण्यापूर्वीचा प्री मॅच शो सुरू असतानाच सुनील गावस्कर यांना एक गंमत सुचली. त्यांनी स्टुडियोमध्ये असलेल्या मयंती लँगर आणि रॉबिन उथप्पा यांना पाहिले आणि म्हणाले की, रॉबिन तू आज मयंतीची पँट का घातलीस? ती तर मी घालणार होतो.
त्यानंतर रॉबिन उथप्पानेही मयंतीच्या जवळ जात गावस्कर यांना गमतीदार प्रतिसाद दिला. तर मयंती म्हणाली की, आज रॉबिन आणि माझ्या स्टायलिस्टांमध्ये बोलणं झालं होतं. तुमच्या आणि माझ्या स्टायलिस्टांमध्ये बोलणं झालं नव्हतं. दरम्यान, गावस्कर यांनी विचारलेला प्रश्न आणि मयंतीने दिलेल्या उत्तरामुळे सामन्यांदरम्यान दोघांच्याही कपड्यांची निवड ही मॅचिंगनुसार होते हे स्पष्ट झाले आहे.