आयपीएलमध्ये मंगवारी रात्री झालेल्या अटीतटीच्या लढतीत पंजाब किंग्स संघाने गुजरात टायटन्सवर ११ धावांनी मात केली. या सामन्यात कर्णधार श्रेयस अय्यर याने केलेली ४२ चेंडूत ९७ धावांची खेळी पंजाबच्या विजयात महत्त्वपूर्ण ठरली आहे. मात्र संधी असूनही श्रेयस अय्यरला शतक पूर्ण करता न आल्याने त्याचे चाहते निराश झाले. तसेच त्यांच्यापैकी काही जणांनी तर शेवटच्या षटकात श्रेयसला स्ट्राइक न दिल्याने शशांक सिंहवर टीकाही केली. मात्र आता संघहितासाठी श्रेयस अय्यरने आपल्या शतकावर पाणी सोडल्याचं समोर आलं आहे. पंजाबच्या डावातील अखेरच्या षटकात श्रेयसोबत मैदानात असलेल्या शशांक सिंह याने त्यावेळी मैदानात काय घडलं, याचा उलगडा आता केला आहे.
पंजाब किंगच्या डावातील १९ व्या षटकाच्या अखेरीस श्रेयस अय्यर ४२ चेंडूत नाबाद ९७ धावांवर खेळत होता. तसेच त्याला शतक ठोकण्यासाठी केवळ ३ धावांची आवश्यकता होती. मात्र शेवटच्या षटकात शशांक सिंह स्ट्राईकवर होता. शशांक सिंहने एकेरी धाव घेत श्रेयसला स्ट्राईक दिली असती तर श्रेयसचं शतक सहजपणे पूर्ण झालं असतं. शेवटच्या षटकात नेमकं काय घडलं, याचा उगलडा करताना शशांक सिंह याने सांगितलं की, ‘’शेवटच्या षटकाला सुरुवात होण्यापूर्वी श्रेयस अय्यर माझ्या जवळ आला. त्याने मला सांगितलं की, तू माझ्या शतकाचा विचार करू नकोस, तर तू तुझे फटके खेळ’’. कर्णधार श्रेयस अय्यरने दिलेल्या या सल्ल्यानंतर शशांक सिंह याने शेवटच्या षटकात तुफानी फटकेबाजी केली. तसेच पंजाब किंग्सला २० षटकांमध्ये ५ बाद २४३ धावांपर्यंत मजल मारून दिली.
यादरम्यान, शशांक सिंह याने १६ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकारांसह ४४ धावांची खेळी केली. आपल्या या खेळीबाबत शशांक म्हणाला की, ही एका चांगली छोटेखानी खेळी होती. तर श्रेयस अय्यर ज्या प्रकारे फलंदाजी करत होता, ते डगआऊटमध्ये बसून पाहणं हा सुखद अनुभव होता. मी जेव्हा फलंदाजीसाठी आलो तेव्हा श्रेयस अय्यरने मला पहिल्या चेंडूपासून फटकेबाजी करण्यास सांगितले. तर शेवटच्या षटकामध्ये माझ्या शतकाची पर्वा करू नको तर आपले फटके खेळण्यावर लक्ष दे, असे मला श्रेयसने सांगितले. त्यानंतर मी केवळ चेंडू पाहून फटके खेळत होतो.