Ishant Sharma Ashutosh Sharma Fight Viral Video IPL 2025 GT vs DC: गुजरात टायटन्सने आपल्या घरच्या मैदानावर दिल्ली कॅपिटल्स ७ गडी राखून पराभूत केले. या विजयासह गुजरातने १० गुणांसह तालिकेत अव्वलस्थान पटकावले. दिल्ली कॅपिटल्सने कर्णधार अक्षर पटेलच्या ३९, आशुतोष शर्माच्या धडाकेबाज ३७ आणि त्रिस्टन स्टब्स, करूण नायरच्या प्रत्येकी ३१ धावांच्या जोरावर बाद २०३ धावसंख्येपर्यंत मजल मारली होती. प्रत्युत्तरात जोस बटलरच्या नाबाद ९७ आणि शेरफेन रुदरफर्डच्या ४३ धावांच्या बळावर गुजरातने सहज विजय मिळवला. या डावात सामन्यात दोन शर्मांमध्ये झालेली बाचाबाची चर्चेचा विषय ठरली.
इशांत शर्मा आणि आशुतोष शर्मा यांच्यात हा प्रकार घडला. दिल्लीच्या डावाच्या १९व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर इशांतने फलंदाज डोवोवन फरेराला बाद केले. त्यानंतर षटकाच्या शेवटच्या चेंडूवर आशुतोष शर्माने गोलंदाजी केली. चेंडू यष्टीरक्षकाकडे गेला आणि त्याने तो झेलला. त्यामुळे इशांत शर्माने अपील केली. पंचांनी लगेच नॉट आऊट घोषित केले. पंचांच्या निर्णयाबाबत इशांत शर्माला शंका होती, त्याला रिव्ह्यू घ्यावासा वाटला, पण गुजरातचे सर्व रिव्ह्यू संपल्यामुळे पुढे काहीच होऊ शकले नाही. अशा परिस्थितीत इशांतला आपला राग अनावर झाला आणि त्याने थेट आशुतोषवर बोट रोखून राग व्यक्त केला. खांद्याला चेंडू लागून गेल्याचे सांगत आशुतोषने त्याला समजवण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही. इशांतच्या मनातील शंका तशीच राहिली.
दरम्यान, दिल्लीच्या वरच्या फळीतील अभिषेक पोरेल (१८), केएल राहुल (२८), करूण नायर (३१) यांना चांगली सुरुवात मिळाली पण ते मोठी खेळी करू शकले नाहीत. पण अक्षर पटेल (३९) आणि ट्रिस्टन स्टब्स (३१) यांच्या अर्धशतकी भागीदारीमुळे आणि आशुतोष शर्माच्या ३७ धावांच्या खेळीमुळे दिल्लीला २०३ धावांचा टप्पा गाठता आला. प्रत्युत्तरात गुजरातला विजयासाठी फारसे कष्ट घ्यावे लागले नाहीत. साई सुदर्शन (३६) आणि शेरफेन रुदरफर्ड (४३) चांगली सुरुवात मिळाल्यावर बाद झाले. जोस बटलरने एक बाजू लावून धरत ५४ चेंडूत धडाकेबाज नाबाद ९७ धावा केल्या.