आयपीएलच्या १८ व्या हंगामात अखेर आरसीबीच्या संघाने फायनल बाजी मारत पहिली ट्रॉफी जिंकली. संघाचा विजय दृष्टीक्षेपात येताच फिल्डवरच विराट कोहलीला अश्रू अनावर झाले. गेल्या १७ वर्षांत जे घडलं नाही ते स्वप्न सत्यात उतरताना पाहताना त्याचे डोळे पाणावल्याचे पाहायला मिळाले. अश्रू अनावर झालेला कोहली सामना संपल्यावर थेट अनुष्काच्या दिशेनं गेला. स्टँडमध्ये बसलेली अनुष्काही लगबगीनं मैदानात आली अन् तिने विराटला मिठी मारली. ही फ्रेम एकदम खास होती. वर्ल्ड कप जिंकल्यावर विराट कोहली एवढा हळवा झाल्याचे पाहायला मिळाले नव्हते.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
विराट कोहलीनं आयपीएलच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत अनेक विक्रम आपल्या नावे केले आहेत. पण १७ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर त्याला ट्रॉफी मिळाली आहे. विराट कोहली फायनलमध्ये अर्धशतकापासून चुकला. यावेळी तो ऑरेंज कॅपच्या शर्यतीतही मागे पडला. पण ट्रॉफी जिंकण्याचा आनंद शतक आणि अन्य रेकॉर्डपेक्षा कित्येकपटीने भारी आहे. अनुष्का शर्मा ही विराटसाठी लकी चार्म आहे. तो आपल्या यशात अनुष्काचा वाटा मोलाचा असल्याचे त्याने अनेकदा सांगितले आहे. ती गोष्ट पुन्हा एकदा पाहायला मिळाले. विराट कोहली आणि अनुष्काचा फायनलनंतर दिसलेली फ्रेम सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.