आयपीएलच्या १८ व्या हंगामातील दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यातील ४६ व्या सामन्यात लोकेश राहुल आणि विराट कोहली यांच्यात शाब्दिक वाद रंगल्याचे दृश्य पाहायला मिळाले. धावांचा पाठलाग करणाऱ्या आरसीबीच्या डावातील ८ व्या षटकात कुलदीप यादवच्या गोलंदाजी दरम्यान दोन स्टार मैदानात एकमेकांसोबत भिडल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यानंतर सोशल मीडियावर दोघांच्या नेमकं काय घडलं? यासंदर्भातील चर्चा रंगताना दिसून येत आहे. जाणून घेऊयात यासंदर्भातील सविस्तर
नेमकं काय घडलं?
विराट कोहली आणि केएल राहुल यांच्यात चांगली मैत्री आहे. मॅच आधी दोघांनी एकमेकांची गळाभेट घेतल्याचेही पाहायला मिळाले होते. पण मॅच दरम्यान जे घडलं त्यामुळे दोघांच्यात खटका उडाल्याची गोष्ट चर्चेत आली. या मॅचआधी दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने बंगळुरुच्या संघाला त्यांच्या घरच्या मैदानात शह दिला होता. यावेळी दमदार इनिंग खेळल्यावर लोकेश राहुलनं हे माझं घरं आहे म्हणत कोहलीला डिवचले होते. याची परतफेड किंग कोहली दिल्लीच्या मैदानात करणार अशी चर्चाही रंगली होती. दिल्लीच्या आपल्या घरच्या मैदानात कोहलीनं दमदार खेळी करत RCB संघाला विजयही मिळवून दिला. पण केएल राहुलसमोर त्याची सेलिब्रेशनची संधी मात्र हुकली. कारण विजयाच्या उंबरठ्यावर असताना विराट कोहली बाद होऊन तंबूत परतला. सामना संपल्यावर विराट कोहली आणि लोकेश राहुल गप्पा गोष्टी करताना दिसून आले. त्यामुळे आठव्या षटकात दरम्यान मैदानात जे घडलं ते फक्त तेवढ्यापुरतेच होते. हेही स्पष्ट झाले.