DC vs RCB Live Match Heated Argument Between Virat Kohli And KL Rahul : आयपीएलच्या १८ व्या हंगामातील दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यातील ४६ व्या सामन्यात लोकेश राहुल आणि विराट कोहली यांच्यात भर मैदानात शाब्दिक वाद रंगल्याचे दृश्य पाहायला मिळाले. दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना १६२ धावा केल्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना आरसीबी संघ अडचणीत सापडला होता. विराट कोहलीनं क्रुणाल पांड्याच्या साथीनं संघाला अडचणीतून बाहेर काढले. आरसीबीच्या डावातील ८ व्या षटकात कोहली आणि लोकेश राहुल दोघे एकमेकांना भिडल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर सोशल मीडियावर दोघांच्या नेमकं काय घडलं? यासंदर्भातील चर्चा रंगताना दिसून येत आहे. जाणून घेऊयात यासंदर्भातील सविस्तर
नेमकं काय घडलं?
दिल्ली कॅपिटल्सकडून कुलदीप यादव घेऊन आलेल्या आठव्या षटकात विराट कोहली स्ट्राइकवर होता. यावेळी किंग कोहलीला विकेटमागे असलेल्या केएल राहुलची कोणती तरी गोष्ट खटकल्याचे व्हायरल व्हिडिओमध्ये दिसते. कोहली विकेट मागे जाऊन केएल राहुलसोबत काहीतरी बोलताना पाहायला मिळाले. यावेळी केएल राहुल हातवारे करून त्याला प्रत्युत्तर देताना पाहायला मिळते. मैदानातील दोघांच्यातीला हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून दोघांच्यात जुंपली होती अशी चर्चा रंगू लागली आहे.
दोघांमध्ये टशन दिसली, अन् सोशल मीडियावर आधीच्या मॅचची चर्चाही रंगली विराट कोहली आणि केएल राहुल यांच्यात चांगली मैत्री आहे. मॅच आधी दोघांनी एकमेकांची गळाभेट घेतल्याचेही पाहायला मिळाले होते. पण मॅच दरम्यान जे घडलं त्यामुळे कोणत्या तरी कारणावरुन दोघांच्यात वाजल्याची गोष्ट चर्चेत आली आहे. या मॅचआधी दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने बंगळुरुच्या संघाला त्यांच्या घरच्या मैदानात शह दिला होता. यावेळी दमदार इनिंग खेळल्यावर लोकेश राहुलनं 'हे माझं घरं आहे..' अशा तोऱ्यात कोहलीसमोर केलेले सेलिब्रेशन गाजले होते. याची परतफेड किंग कोहली दिल्लीच्या मैदानात करणार अशी चर्चाही रंगली होती. त्याचाच हा एक भाग असावा, अशी चर्चाही सोशल मीडियावर रंगत आहे.
पण मॅचनंतर पुन्हा दोघांमध्ये दिसला 'ऑल इज वेल सीन'
दिल्लीच्या आपल्या घरच्या मैदानात कोहलीनं दमदार खेळी करत RCB संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचललाय पण केएल राहुलसमोर खास सेलिब्रेशन करण्याची कोहलीची संधी मात्र हुकली. कारण संघ विजयाच्या उंबरठ्यावर असताना विराट कोहली बाद होऊन तंबूत परतला. सामना संपल्यावर विराट कोहली आणि लोकेश राहुल गप्पा गोष्टी करतानाही दिसून आले. त्यामुळे मैदानात जे घडलं ते फक्त तेवठ्या पुरतेच होते. हेही स्पष्ट झाले.