IPL 2025 DC vs KKR Ajinkya Rahane On His Injured Finger : दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाने दिल्ली कॅपिटल्सला रोखत १४ धावांनी विजय नोंदवला. दिल्ली कॅपिटल्सच्या संघाच्या तुलनेत कोलकाता नाईट रायडर्ससाठी हा सामना खूप महत्त्वपूर्ण होता. २ गुण आपल्या खात्यात जमा करत KKR च्या संघाने प्लेऑफ्सची आस कायम ठेवलीये. पण या सामन्यादरम्यान कर्णधार अजिंक्य रहाणेनं दुखापतीमुळे मैदान सोडल्याचे पाहायला मिळाले. प्रत्येक सामना महत्त्वाचा झाला असताना तो उर्वरित सामन्यात दिसणार की, नाही? असा प्रश्न निर्माण झाला आहे. सामन्यानंतर खुद्द अजिंक्य रहाणेनं आपल्या दुखापतीसंदर्भात माहिती देत चाहत्यांना मोठा दिलासा दिला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मॅच जिंकल्यावर अजिंक्य रहाणेनं दिला मोठा दिलासा
अजिंक्य रहाणेला क्षेत्ररक्षण करताना चेंडू बोटाला लागला. त्यानंतर त्याने मैदान सोडल्याचे पाहायला मिळाले. संघाच्या क्षेत्ररक्षणावेळी हाताला पट्टी बांधून तो डग आउटमध्ये बसल्याचे दिसले. हे दृश्य चाहत्यांची धकधक वाढवणारे होते. पण मॅच जिंकल्यावर तोच पोस्ट मॅच प्रेंझेंटेशनला आला. यावेळी त्याला पहिला प्रश्न हा दुखापतीसंदर्भात विचारण्यात आला होता. यावर अजिंक्य रहाणे म्हणाला की, दुखापत फार गंभीर नाही. मी ठिक होईन.
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
टर्निंग पाइंट सांगताना बॅटिंगमध्ये कमी पडल्याचीही दिली कबुली
सामन्याबद्दल बोलताना अजिंक्य रहाणे म्हणाला की, सुनील नरेन याने १३ व्या षटकात घेतलेल्या २ विकेट्स या सामन्याला कलाटणी देण्याऱ्या ठरल्या. या खेळपट्टीवर २०४ धावा चांगल्या होत्या. पण खरं सांगायचं तर १५ धावा आम्ही कमीच केल्या होत्या, असे म्हणत बॅटिंगमध्ये कमी थोडे कमीच पडलो, ही गोष्टही त्याने बोलून दाखवली. यावेळी त्याने रसेलसह अनुकुल रॉयनं केलेल्या गोलंदाजीचं कौतुकही केले. या विजयाने आम्हाला आत्मविश्वास मिळेल आणि आम्ही आणखी चांगला खेळ करून, असे म्हणत प्लेऑफ्समध्ये धडक मारण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही त्याने म्हटले आहे.
एका सामन्यात दोन्ही कर्णधारांना झाली दुखापत
कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार अजिंक्य रहाणे याला दिल्ली कॅपिटल्सच्या डावातील १२ व्या षटकात चेंडू लागल्यामुळे उजव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली. दुसरीकडे कोलकाताच्या डावातील १९ व्या षटकातरोव्हमन पॉवेलचा चेंडू अडवताना दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेल दुखापतग्रस्त झाला. त्यानंतरही बॅटिंगला येऊन अक्षर पटेलनं ४३ धावांची खेळी केली. पण दुखापतीसंदर्भात बोलताना लवकर रिकव्हर होईल, अशी खात्री त्याला नव्हती. एका बाजूला मॅचनंतर अजिंक्य रहाणे सर्व ठिक आहे असे म्हणाला. दुसरीकडे अक्षर पटेलनं बॅटिंग करताना वेदना होत होत्या असे सांगत वेळेत दुखापत बरी झाली तर ठिकच आहे, असे म्हटल्याचे पाहायला मिळाले.
Web Title: IPL 2025 DC vs KKR Not bad I Will Be Okay Ajinkya Rahane On His Injured Finger
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.