रजत पाटीदारच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघानं चेन्नईच्या चेपॉकच्या मैदानातील पराभवाची मालिका खंडीत करत चेन्नई सुपर किंग्जला त्यांच्या बालेकिल्ल्यात पराभूत केले आहे. २००८ च्या पहिल्या हंगामात आरसीबीच्या संघानं इथं चेन्नईला पराभूत केले होते. त्यानंतर सातत्याने त्यांच्या पदरीप पराभवच आल्याचे पाहायला मिळाले. तब्बल १७ वर्षांनी नव्या नेतृत्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघानं पिवळ्या जर्सीतील संघासमोर आपल्या ताफ्यातील धमक दाखवून दिली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
आरसीबीचा यंदाच्या हंगामातील सलग दुसरा विजय
आरसीबीनं दिलेल्या १९७ धावांचा पाठलाग करताना सीएसकेचा संघ निर्धारित २० षटकात ८ विकेट्सच्या मोबदल्यात फक्त १४६ धावांपर्यंतच मजल मारू शकला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा चेन्नईच्या चेपॉकच्या मैदानातील हा दुसरा विजय ठरला. एवढेच नाही तर यंदाच्या हंगामात पहिल्या सामन्यात कोलकाताच्या संघाला आणि आता चेन्नईच्या घरच्या मैदानात पराभूत करत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघानं यंदाच्या हंगामातील दुसऱ्या विजयाची नोंद करत ४ गुण आपल्या खात्यात जमा केले आहेत.
आरसीबीकडून रजत पाटीदारची फिफ्टी
पहिल्यांदा फलंदाजी करताना रजत पाटीदारनं केलेल्या ३२ चेंडूतील ५१ धावांसह फिल सॉल्ट ३२ (१६), विराट कोहली ३१ (३०), देवदत्त पडिक्कल २७ (१४), आणि टीम डेविडनं ८ चेंडूत नाबाद २२ धावांची केलेल्या उपयुक्त खेळीच्या जोरावर आरसीबीच्या संघानं निर्धारित २० षटकात ७ विकेट्सच्या मोबदल्यात १९६ धावा केल्या होत्या. गोलंदाजीत चेन्नईकडून नूर अहमदनं सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. त्याच्याशिवाय मथीशा पथिरना याने २ तर खलील अहमद आणि अश्विनला प्रत्येकी १-१ विकेट मिळाली.
चेन्नई सुपर किंग्जचा बॅटिंगमध्ये फ्लॉप शो, पॉवर प्लेमध्ये आघाडीच्या फलंदाजांनी टाकली नांगी
आरसीबीनं दिलेल्या धावांचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्जची सुरुवात खराब झाली. राहुल त्रिपाठी ५(३), ऋतुराज गायकवाड ०(४) आणि दीपक हुड्डा ४ (९) या आघाडीच्या फलंदाजांनी पॉवरप्लेमध्ये तंबूचा रस्ता धरला. एका बाजूला रचिन रवींद्रनं तग धरून बॅटिंग करताना ३१ चेंडूत ४१ धावा केल्या, पण दुसऱ्या बाजूनं त्याला साथ मिळाली नाही. अखेरच्या षटकात धोनीची फटकेबाजीही पाहायला मिळाली. त्याने १६ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकाराच्या मदतीने केलेल्या ३० धावा केल्या. तो नाबाद परतला ही गोष्ट सोडली तर चेन्नईच्या चाहत्यांसाठी हा सामना निराशजनकच राहिला. आरसीबीकडून जोश हेजलवूड याने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. याशिवाय यश दयाल, लायम लिविंगस्टोन यांनी प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या. भुवनेश्वर कुमारनं १ विकेट घेतली.