Yuzvendra Chahal Hat Trick : आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी गोलंदाज युजवेंद्र चहल याने चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या सामन्यात आयपीएल कारकिर्दीतील आपली दुसरी हॅटट्रिक नोंदवली आहे. पहिल्या दोन षटकात चहल चांगलाच महागडा ठरला होता. २ षटकात त्याने २३ धावा खर्च केल्या. महेंद्रसिंह धोनीसाठी पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरनं त्याला मागे ठेवल्याचे पाहायला मिळाले. धोनी मैदानात येताच १९ व्या षटकात श्रेयस अय्यरनं फिरकीपटू युजवेंद्र चहलच्या हाती चेंडू सोपवला. धोनीनं षटकार मारून चहलचे स्वागत केले. पण पुढच्याच चेंडूवर तो चहलच्या जाळ्यात सापडला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
चहलनं IPL मध्ये दुसऱ्यांदा साधला हॅटट्रिकचा डाव
धोनीची विकेट घेतल्यावर १९ व्या षटकातील चौथ्या चेंडूवर चहलनं दिपक हुड्डाला प्रियांश करवी झेलबाद केले. त्याची जागा घेण्यासाठी मैदानात उतरलेल्या अंशुल कंबोजला त्रिफळाचित करत चहल हॅटट्रिकवर पोहचला. त्यानंतर नूर अहमदला मार्को यान्सेन करवी झेलबाद करत चहलनं आयपीएलमधील दुसरी हॅटट्रिक पूर्ण केली. याआधी त्याने राजस्थानच्या संघाकडून खेळताना पहिली हॅटट्रिक घेतली होती.
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
चहल दोन वेगवेगळ्या फ्रँचायझीकडून हॅटट्रिक घेणारा पहिला गोलंदाज
चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या सामन्यात लेग-स्पिनर युजवेंद्र चहलनं एकाच षटकात चार बळी घेतले. याआधी २०२२ च्या हंगामात राजस्थान रॉयल्सच्या संघाकडून खेळताना त्याने कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात पहिली हॅटट्रिक नोंदवली होती. पंजाबकडून त्याने दुसऱ्यांदा हॅटट्रिकचा डाव साधला. तो आयपीएलमध्ये दोन वेगवेगळ्या फ्रँचायझीकडून हॅटट्रिकचा डाव साधणारा एकमेवर गोलंदाज आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा हॅटट्रिक घेण्याचा विक्रम हा अमित मिश्राच्या नावे आहे. त्याने ३ वेळा हॅटट्रिकचा डाव साधला आहे. चहलनं दुसऱ्यांदा हॅटट्रिकचा डाव साधत युवराज सिंगच्या विक्रमाची बरोबरी केली. युवीनंही आयपीएलमध्ये दोन वेळा हॅटट्रिकचा डाव साधला आहे.