IPL 2025 CSK vs KKR MS Dhoni Controversial LBW Decision : इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेतील कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जला पाचव्या पराभवाचा सामना करावा लागला. घरच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात फलंदाजांनी नांगी टाकल्यामुळे संघाच्या अडचणी वाढल्या. पुन्हा नेतृत्वाची धूरा सांभाळणाऱ्या महेंद्रसिंह धोनीलाही आपल्या भात्यातील फटकेबाजी दाखवता आली नाही. एकामागून एक विकेट गमावल्यावर CSK च्या संघाने इम्पॅक्ट प्लेयरच्या रुपात दीपक हुड्डावर डाव खेळला. पण तोही काही प्रभाव टाकू शकला नाही. त्याची विकेट पडल्यावर धोनी मैदानात आला. पण त्याला अवघ्या एका धावेवर तंबूत परतावे लागले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
विकेट वाचवण्यासाठी MS धोनीन रिव्ह्यू घेतला पण निर्णय KKR च्या बाजूनं झुकला
संघाच्या धावफलकावर फक्त ७२ धावा असताना धोनी मैदानात उतरला. तो आपल्या फटकेबाजीसह संघाच्या धावफलकावर आव्हानात्मक धावसंख्या उभारण्यास मदत करेल, अशी अपेक्षा होती. पण सुनील नरेन पुन्हा एकदा त्याच्यासमोर भारी ठरला. चेन्नई सुपर किंग्जच्या डावातील १६ व्या षटकात सुनील नरेन याने धोनीला पायचित केले. चेंडूनं बॅटची कड घेतलीये या आत्मविश्वासानं धोनीने आपली विकेट वाचवण्यासाठी रिव्ह्यू घेतला. पण तो अपयशी ठरला. तिसऱ्या पंचांनी मैदानातील पंचाचा निर्णय कायम ठेवला आणि धोनीला तंबूत परतावे लागले.
धोनीची संतप्त प्रतिक्रिया
एम एस धोनीच्या पॅडवर चेंडू आदळल्यावर सुनील नरेन याने अपील केली. क्षणाचाही विलंब न करता धोनीनं बॅट दाखवत चेंडू बॅटला लागल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. पण मैदानातील पंचांनी त्याला आउट दिले. DRS चा निर्णयही KKR च्या बाजूनं झुकल्यावर धोनी अंपायरवर संतापल्याचेही पाहायला मिळाले. तो काहीतरी बडबडत मैदानाबाहेर आला. फार कमी वेळा धोनी मैदानात राग व्यक्त करतो. कोलकाता विरुद्धच्या सामन्यात निर्णय खटकल्यावर कॅप्टन कूलचा नाराज झाल्याचे पाहायला मिळाले. स्टँडमध्ये बसलेल्या रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबाने तर धोनीला आउट दिल्यावर आपला चेहराच लपल्याचे दिसून आले.
धोनी आउट होता की की नॉट आउट?
धोनीसंदर्भातील निर्णयावर सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे. बारिक स्निको दिसूनही तिसऱ्या पंचांनी त्याला आउट दिले, अशी चर्चाही रंगल्याचे दिसते. धोनीनं रिव्ह्यू घेतल्यावर पुन्हा पुन्हा रिप्लाय पाहून टेलिव्हिजन अंपायरने मैदानातील पंचाचा निर्णय कायम ठेवला. बॅट आणि बॉल संपर्क दाखवणारा किंचित स्निको अंपायरला दिसला नाही का? असा प्रश्नही उपस्थितीत करण्यात येतोय. पण नियमानुसार, सबळ पुरावा नसेल तर मैदानातील निर्णय कायम ठेवण्यात येतो. याच आधारावर टेलिव्हिजन अंपायरने निर्णय घेतल्याचे पाहायला मिळाले.