Join us

IPL 2025: CSKच्या फॅन्सची चिंता वाढली! ऋतुराज पाठोपाठ MS धोनीलाही दुखापत? Viral Video मुळे चर्चा

MS Dhoni Viral Video CSK IPL 2025: सामन्यानंतर हॉटेलमध्ये CSKचा संघ पोहोचला तेव्हा व्हिडीओ झालाय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 16:43 IST

Open in App

MS Dhoni Viral Video CSK IPL 2025: आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघापैकी एक मानला जाणारा चेन्नई सुपर किंग्जचा संघ यंदा काहीसा गडबडलाय. सलामीचा सामना जिंकल्यानंतर चेन्नईला सलग ५ पराभव पचवावे लागले. त्यानंतर अखेर सोमवारी चेन्नई सुपर किंग्जला हंगामातील दुसरा विजय मिळाला. लखनौच्या घरच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या सामन्यात चेन्नईने लखनौचा ५ विकेट्सनी पराभव केला. सलामीचे दोन सामने गमावल्यानंतर लखनौने सलग सामने जिंकण्याचा सपाटा लावला होता. पण त्यांची काल विजयाची मालिका खंडीत झाली. लखनौने प्रथम फलंदाजी करताना कर्णधार रिषभ पंतच्या अर्धशतकाच्या जोरावर २० षटकांत १६६ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात चेन्नई सुपर किंग्जने महेंद्रसिंग धोनीच्या उपयुक्त खेळीच्या बळावर हे लक्ष्य १९.३ षटकांत ५ गडी राखून पूर्ण केले. या विजयाने चेन्नईचे चाहते खुश झाले. पण त्याचदरम्यान, एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यामुळे चेन्नईच्या चाहत्यांची चिंता वाढू शकते.

चेन्नईचा नियमित कर्णधार ऋतुराज गायकवाड खांद्याच्या दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर झाला. त्याची दुखापत इतकी गंभीर होती की त्याला संपूर्ण स्पर्धेतूनच माघार घ्यावी लागली. त्याजागी धोनी कर्णधार झाला आणि लखनौमध्ये LSG विरुद्ध शेवटच्या काही षटकांत फटकेबाजी करत धोनीने आपल्या संघाला विजय मिळवून दिला. त्यानंतर टीम हॉटेलमध्ये त्याचे जोरदार स्वागत करण्यात आले. पण यावेळी तो लंगडताना दिसला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे. सामन्याच्या शेवटच्या षटकात खेळतानाही तो काहीसा अडचणीत असल्याचे दिसले होते. त्यामुळे जर धोनीची दुखापत गंभीर असेल तर हा चेन्नई सुपर किंग्जसाठी खूप मोठा धक्का ठरू शकतो.

२०२४ मध्ये आयपीएल दरम्यान एमएस धोनीला स्नायूंच्या ताणाची समस्या होती. तो पूर्णपणे तंदुरुस्त नव्हता, तरीही तो खेळत राहिला. त्याआधी जून २०२३ मध्ये मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रियादेखील झाली होती. असे असताना त्याचा लंगडतानाचा व्हिडीओ त्याच्यासाठी आणि संघासाठी धोक्याची घंटा ठरू शकते.

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५चेन्नई सुपर किंग्समहेंद्रसिंग धोनीव्हायरल व्हिडिओ