Operation Sindoor, Indian Forces, IPL 2025: आयपीएलच्या साखळी फेरीतील शेवटचा आठवडा सुरू आहे. त्यानंतर प्लेऑफचे सामने आणि अखेरीस अंतिम सामना खेळवला जाणार आहे. तशातच आयपीएलचा समारोप समारंभ भारतीय सशस्त्र दलांना समर्पित केला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. 'ऑपरेशन सिंदूर'च्या हिरोंचा यावेळी सन्मान केला जाईल. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) जाहीर केले आहे की, आगामी आयपीएल २०२५चा समारोप समारंभ भारतीय सशस्त्र दलांच्या सन्मानार्थ समर्पित केला जाईल.
हा समारंभ ३ जून रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. तेथेच आयपीएलचा अंतिम सामनाही खेळवला जाणार आहे. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारतीय सैन्याने दहशतवादी तळांविरुद्ध केलेल्या यशस्वी कारवाईचा सन्मान करण्यासाठी हा सोहळा असणार आहे. बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया म्हणाले- बीसीसीआयच्या वतीने आम्ही आमच्या शूर सैनिकांच्या शौर्य, धाडस आणि निःस्वार्थ सेवेला सलाम करतो. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत आपल्या सैनिकांनी दाखवलेले शौर्य देशालाही सुरक्षित ठेवते आणि आपल्या सर्वांना प्रेरणाही देते. या सन्मानार्थ, आम्ही आयपीएल २०२५चा समारोप समारंभ सैन्याला समर्पित करण्याचा आणि आमच्या सैनिकांचा सन्मान करण्याचा निर्णय घेतला आहे. देशाचे सार्वभौमत्व, अखंडता आणि सुरक्षा सर्वप्रथम महत्त्वाची आहे. क्रिकेट हा देशाचा आवडता खेळ आहे. त्यामुळेच आम्ही त्यांना यामार्फत सन्मानित करणार आहोत.
![]()
२२ एप्रिलला जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ नागरिकांचा मृत्यू झाला. त्यानंतर भारतीय सशस्त्र दलांनी 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळ बेचिराख केले. या हल्ल्यानंतर आयपीएल एका आठवड्यासाठी पुढे ढकलण्यात आले होते. स्पर्धा पुन्हा सुरू झाल्यानंतर, विविध सामन्यांमध्ये खेळाडूंनी राष्ट्रगीत गायले आणि स्टेडियममध्ये "Thank You Armed Forces" असे मेसेजही प्रदर्शित करण्यात आले.
Web Title: ipl 2025 closing ceremony operation sindoor tribute armed forces bcci salutes soldiers at narendra modi stadium
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.