MS Dhoni CSK coach Stephen Fleming, IPL 2025: यंदाच्या आयपीएल हंगामात चेन्नई सुपर किंग्ज संघाचा फॉर्म चिंतेचा विषय ठरताना दिसतोय. विजयाने सुरुवात केलेल्या CSKचा त्यापुढच्या सलग ५ सामन्यात पराभव झाला. नियमित कर्णधार ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात संघाला ५ पैकी ४ सामन्यात पराभूत व्हावे लागले होते. त्याजागी एमएस धोनीकडे नेतृत्व आल्यानंतरही काहीच फरक पडला नाही. सर्वात ताज्या सामन्यात, चेन्नईला कोलकाता नाइट रायडर्स संघाने चेन्नईच्या चेपॉक मैदानावर ८ गडी आणि तब्बल ५९ चेंडू राखून पराभवाची धूळ चारली. चेन्नईला हा पराजय जिव्हारी लागणारा होता. या पराभवानंतर चाहत्यांनी धोनीवर टिकास्त्र सोडले. पण संघाचा मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंगने मात्र त्याचा बचाव केला.
धोनीला कर्णधारपद मिळाले असले म्हणून अचानक संघाच्या कामगिरीत मोठा बदल होईल असे कुणीही समजून घेऊ नये असे स्टीफन फ्लेमिंग म्हणाला. धोनी हा एक उत्तम खेळाडू आहे यात वादच नाही पण तो भविष्य पाहू शकणारा माणूस नाहीये असेही फ्लेमिंगने अधोरेखित केले. पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना फ्लेमिंग म्हणाला, "कुठलाही संघ असो, धोनीचा प्रभाव नक्कीच परिणामकारक असतो. पण असे असले तरीही धोनी हा ज्योतिषी नाही, त्याच्याकडे भविष्य पाहण्याचे सामर्थ्य नाही. त्याच्याकडे जादुची कांडी नाही. त्यामुळे संघाच्या कामगिरीत अचानक मोठा बदल होईल अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे."
"गेल्या सामन्यातील निराशाजनक बाब म्हणजे आम्ही समोरच्या संघाला आव्हान देण्यात खूपच कमी पडलो. प्रतिस्पर्धी संघाला तगडी टक्कर देण्यात आम्ही अयस्शवी ठरलो. त्यागोष्टीचे नक्की आम्हाला खूप दुःख झाले. गेल्या सामन्यानंतर अंतर्गत आत्मपरीक्षण झाले. बऱ्याच गोष्टींची चर्चा झाली," असे फ्लेमिंग म्हणाला.