Big Blow to Lucknow Super Giants : चॅम्पियन्स ट्रॉफीचा हंगाम संपला. भारताने न्यूझीलंडला पराभूत करून विजेतेपद पटकावले. आता देशातील सर्वात श्रीमंत मानल्या जाणाऱ्या टी२० लीग स्पर्धेला म्हणजे IPL ला सुरुवात होणार आहे. IPL 2025 हंगाम २२ मार्चपासून सुरू होणार आहे. या हंगामासाठी सर्व संघ तयारी करत आहेत. यादरम्यान, लखनौ सुपर जायंट्स संघासाठी एक वाईट बातमी आली आहे. लखनौ सुपर जायंट्सचा स्टार खेळाडू सध्या दुखापतींशी झुंज देत आहे. एका रिपोर्टनुसार, हा खेळाडू यंदाच्या हंगामातील सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकणार आहे. मेगा लिलावापूर्वी कोट्यवधी रुपये खर्च करून एलएसजीने मयंक यादव ( Mayank Yadav ) या खेळाडूला ११ कोटींची रक्कम देऊन संघात कायम ठेवले होते.
IPL 2025 पूर्वी LSG ला धक्का
लखनौ सुपर जायंट्सचा वेगवान गोलंदाज मयंक यादव अजूनही दुखापतीतून सावरलेला नाही. गेल्या ऑक्टोबरमध्ये बांगलादेश विरुद्धच्या टी२० पदार्पणाच्या मालिकेत मयंकला दुखापत झाली होती. तो पाठीच्या दुखापतीने त्रस्त आहे. ESPNcricinfo च्या रिपोर्टनुसार, मयंक यादव आयपीएल २०२५च्या पहिल्या सहा-सात सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे. मयंकने अलिकडेच बेंगळुरूमधील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये पुन्हा गोलंदाजी सुरू केली आहे. जर त्याने त्याच्या गोलंदाजीचा वर्कलोड वाढवला आणि सर्व फिटनेस पॅरामीटर्स पूर्ण केले तर तो आयपीएलच्या दुसऱ्या भागापर्यंत खेळण्यास पात्र ठरू शकेल.
IPL 2024 मध्ये झाला होता दुखापतग्रस्त
गेल्या हंगामापूर्वी मयंक यादवला लखनौ सुपर जायंट्सने २० लाख रुपयांना अनकॅप्ड वेगवान गोलंदाज म्हणून खरेदी केले होते. ताशी १५० किलोमीटरपेक्षा जास्त वेगाने सातत्याने गोलंदाजी करू शकणारा गोलंदाज अशी त्याची चर्चा रंगली होती. पण तो IPL 2024 मध्ये फक्त ४ सामने खेळू शकला. यानंतर तो साईड स्ट्रेनच्या दुखापतीमुळे संघाबाहेर पडला. त्यानंतर रिहॅब दरम्यानही त्याला आणखी एक दुखापत झाली होती. गेल्या सामन्यात ४ सामनेच खेळू शकलेला मयंक यंदा मात्र ११ कोटींचा धनी ठरला. लखनौ सुपर जायंट्सने त्याला ११ कोटी रुपयांना रिटेन केले. पण आता त्याच्या दुखापतीमुळे तो संघाला किती सेवा पुरवू शकतो हे पाहणे महत्त्वाचे आहे.