इंग्लंडचा कॅप्टन आणि स्टार बॅटर जोस बटलरवर याच्यावर मेगा लिलावात मोठी बोली लागली आहे. विकेट किपर बॅटरसह कॅप्टन्सीचा एक सर्वोत्तम पर्याय असणाऱ्या बटलरसाठी फ्रँचायझी संघात चांगलीच चढाओढ पाहायला मिळाली. यात शेवटी गुजरात टायटन्सच्या संघानं बाजी मारली. नेहरानं हा चेहरा हेरला अन् मालकांनी पर्समधून १५.७५ कोटी काढले. आतापर्यंत आयपीएलमधील बटलरला मिळालेली ही सर्वात मोठी रक्कम आहे.
इंग्लंडचा स्टार बॅटर जोस बटलर मेगा लिलावात मार्की प्लेयर्सच्या पहिल्या गटात होता. गत हंगामात राजस्थान रॉयल्सच्या ताफ्यात दिसलेल्या बटलरनं आगामी हंगामासाठी २ कोटी मूळ किंमतीसह लिलावात सहभाग घेतला होता. स्फोटक बॅटिंगसह विकेट किपरच्या रुपात तगडा खेळाडू महागड्या खेळाडूंच्या यादीत असणार हे जवळपास निश्चित होते. आणि अगदी तेच झाले.
MI च्या ताफ्यातून IPL मध्ये एन्ट्री, राजस्थाननं केलं होत रिलीज
२०१६ च्या हंगामासाठी झालेल्या मेगा लिलावात तो पहिल्यांदा सहभागी झाला होता. यावेळी मुंबई इंडियन्सच्या संघाने ३.८ कोटींसह जोस बटलरला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले होते. दोन हंगाम मुंबईच्या ताफ्यातून खेळल्यानंतर तो राजस्थान रॉयल्सच्या संघात गेला. २०१८ ते २०२१ या कालावधीत प्रत्येक हंगामासाठी राजस्थान रॉयल्स संघाने त्याच्यासाठी ४.४० कोटी एवढी रक्कम मोजली होती. २०२२ ते २०२३ या हंगामात तो १० कोटींपर्यंत पोहचला होता. आता त्याने आयपीएलमधील कमाईच्या बाबतीत आणखी पुढे झेप घेतल्याचे दिसते.
IPL मेगा लिलावात देश विदेशातील खेळाडूंची गर्दी इंडियन प्रीमियर लीगच्या २०२५ मध्ये होणाऱ्या मेगा लिलावासाठी देश विदेशातील एकूण १५७४ खेळाडूंनी नाव नोंदणी केली होती. यातील ५७४ खेळाडूंना शॉर्टलिस्ट करण्यात आले होते. अंतिम यादी निश्चित झाल्यानंतर सौरव नेत्रावळकर, जोफ्रा आर्चर आणि हार्दिक तामोरे यांचाही यादीत समावेश करण्यात आला होता. त्यामुळे लिलावातील खेळाडूंचा आकडा हा ३६७ भारतीय आणि २१० परदेशी खेळाडूंसह एकूण ५७७ असा झाला. २०१८ च्या लिलावानंतर पहिल्यांदाच मार्की प्लेयर्सची दोन गटात विभागणी करण्यात आल्याचेही यावेळी पाहायला मिळाले.