Join us

व्वा अजिंक्य! 'नशीब असावं तर असं...' आधी अनसोल्डचा टॅग; मग KKR नं बोली लावली अन् आता कॅप्टन

Ajinkya Rahane New KKR Captain: मेगा लिलावात अनसोल्डचा टॅग, मग केकेआरनं केली होती स्वस्तात मस्त शॉपिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 17:00 IST

Open in App

KKR New Captain 2025: आयपीएल २०२५ च्या हंगामात अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) कोलकाता नाईट रायडर्स संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. आगामी हंगामासाठी शाहरुखच्या मालकीच्या संघानं त्याच्यावर कॅप्टन्सीचा डाव खेळला आहे. गत हंगामात संघाला चॅम्पियन करणाऱ्या मुंबईकर श्रेयस अय्यरला नारळ दिल्यावर कोलकाता संघ कुणाला कॅप्टन करणार हा मुद्दा चांगलाच चर्चेत आला होता.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

केकेआरच्या ताफ्यातील महागडा गडी उप कॅप्टन;अजिंक्यच्या गळ्यात पडली कॅप्टन्सीची माळ या शर्यतीत व्यंकटेश अय्यरचं नाव चर्चेत होते. यामागचं कारण त्याच्यासाठी संघाने २३ कोटी खर्च करून त्याला रिटेन केले होते. पण या गड्याला मागे टाकत शेवटी अजिंक्य रहाणेच्या गळ्यात कॅप्टन्सीची माळ पडलीये. १.५ कोटीचा गडी कोलकाता नाईट रायडर्सचा कॅप्टन झाला असून ताफ्यातील सर्वात महागड्या व्यंकटेश अय्यरला उप कॅप्टन करण्यात आले आहे.  

मेगा लिलावात अखेरच्या टप्प्यात स्वस्तात मस्त शॉपिंग, इथंच मिळाली होती हिंट

आयपीएल २०२५ साठी झालेल्या  मेगा लिलावात अजिंक्य रहाणे हा पहिल्या फेरीत अनसोल्ड राहिला होता. दुसऱ्या राउंडमध्ये कोलकाता नाईट रायडर्सच्या संघानं १.५ कोटी या मूळ किंमतीसह त्याला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले. मेगा लिलावात श्रेयस अय्यरला पुन्हा आपल्या ताफ्यात घेण्यात संघाने रस दाखवला नसला तरी शेवटच्या टप्प्यात केकेआरनं अजिंक्य रहाणेवर खेळलेला डाव हा कॅप्टन्सीची स्वस्तात मस्त शॉपिंग असावी, अशी हिंट मिळाली होती. अखेर तेच झाले. याच गड्याला कोलकाता नाईट रायडर्स संघाची कॅप्टन्सी मिळाली.

कॅप्टन्सीचं परफेक्ट चॉईस, कारण...

अजिंक्य रहाणे हा अनुभवी क्रिकेटर आहे. त्याने भारतीय संघाचेही नेतृत्व केले आहे. खास गोष्ट ही की, त्याच्या नेतृत्वाखालील भारतीय संघानं अशक्यप्राय वाटणारी गोष्ट शक्य करून दाखवलीये. २०२१ मध्ये तत्कालीन टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीच्या अनुपस्थितीत ६ कसोटी सामन्यात टीम इंडियाचे ४ सामन्य्यात विजय मिळवला असून २ सामने अनिर्णित राखण्याचा रेकॉर्ड अजिंक्यच्या नावे आहे. ऑस्ट्रेलियातील भारताच्या ऐतिहासिक कसोटी मालिका विजय हा त्याच्याच नेतृत्वाखाली आला होता. देशांतर्गत क्रिकेटमध्ये रणजी करंडक स्पर्धेत पुन्हा मुंबईला सोनेरी दिवस आणण्याचे काम अजिंक्य रहाणेनंच करून दाखवले. रणजीच्या गत हंगामात मुंबईला त्याने प्रतिष्ठित रणजी ट्रॉफी जिंकून दिली होती. भारतीय संघाबाहेर असतानाही देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने बॅटिंगसह आपल्या कॅप्टन्सीचं कर्तृत्व सिद्ध केले. त्यामुळे कोलकाताच्या संघाने त्याच्यावर कॅप्टन्सीचा डाव खेळला आहे.

टॅग्स :अजिंक्य रहाणेकोलकाता नाईट रायडर्सइंडियन प्रिमियर लीग २०२५वेंकटेश अय्यर