Mayank Yadav LSG, IPL 2025 : सलग ५ पराभव पचवलेल्या चेन्नई सुपर किंग्जच्या संघाला अखेर सोमवारी लखनौ सुपर जायंट्स विरूद्ध विजय मिळाला. लखनौच्या घरच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या सामन्यात चेन्नईने लखनौचा ५ विकेट्सनी पराभव केला. कर्णधार रिषभ पंतच्या अर्धशतकाच्या जोरावर लखनौने २० षटकांत १६६ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात चेन्नई सुपर किंग्जने महेंद्रसिंग धोनीच्या उपयुक्त खेळीच्या बळावर हे लक्ष्य १९.३ षटकांत ५ गडी राखून पूर्ण केले. चेन्नईच्या विजयाने लखनौची विजयी लय खंडीत झाली. पण आता त्यांना आणि त्यांच्या चाहत्यांना एक खुशखबर मिळाली आहे. तब्बल ११ कोटींना संघात कायम ठेवलेला त्यांचा वेगवान गोलंदाज मयंक यादव आता पुन्हा संघात सामील झाला आहे.
लखनौ सुपर जायंट्सचा स्टार खेळाडू गेल्या काही आठवड्यांपासून दुखापतींशी झुंज देत आहे. एका रिपोर्टनुसार, हा खेळाडू यंदाच्या हंगामातील सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकणार हे स्पष्ट करण्यात आले होते. मेगा लिलावापूर्वी ११ कोटी खर्च करून एलएसजीने मयंक यादवला संघात कायम ठेवले होते. लखनौ सुपर जायंट्सचा वेगवान गोलंदाज मयंक यादव गेल्या आठवड्यापर्यंत पूर्णपणे तंदुरूस्त झालेला नव्हता. पण आता मात्र तो संघात परतला आहे.
गेल्या ऑक्टोबरमध्ये बांगलादेश विरुद्धच्या टी२० पदार्पणाच्या मालिकेत मयंकला दुखापत झाली होती. तो पाठीच्या दुखापतीने त्रस्त होता. एका रिपोर्टनुसार, मयंक यादव आयपीएल २०२५च्या पहिल्या सहा-सात सामन्यांना मुकण्याची शक्यता होती. रिहॅबदरम्यान मयंकने बेंगळुरूमधील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये पुन्हा गोलंदाजी सुरू केली. त्याची तंदुरूस्ती पाहूनच त्याच्या गोलंदाजीचा वर्कलोड वाढवण्यात आला आणि सर्व फिटनेस पॅरामीटर्स पूर्ण केल्यानंतर त्याला संघात सामील होण्यास हिरवा कंदील दाखवण्यात आला.