Join us  

वाचनीय : चाहत्यांनी ट्रोल करताना दिग्गजांना नाही सोडलं, मग हार्दिकची काय बिशाद!

सार्वजनिक आयुष्य जगणाऱ्यांसाठी आनंद बक्षी यांनी लिहिलेले गीत अचूक लागू होते. “ये जो पब्लिक है, सब जानती है... अजी अंदर क्या है, बाहर क्या है, ये सब कुछ पहचानती है...”

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2024 7:48 AM

Open in App

मतीन खान, स्पोर्ट्‌स हेड - सहायक उपाध्यक्ष, लोकमत पत्रसमूह

हार्दिकला सध्या घरच्याच मैदानावर प्रेक्षकांकडून वाईटरीत्या बू किंवा हूट केले जात आहे. मुंबईचे क्रिकेटप्रेमी हे दर्दी म्हणून ओळखले जातात. वानखेडे स्टेडियमचा इतिहास आहे की, येथे प्रेक्षक खेळाडूला डोक्यावर घेऊन नाचतात, त्याचप्रमाणे त्याला डोक्यावरून उतरवायलाही वेळ लावत नाहीत. कारण, मुंबई भारतीय क्रिकेटचे माहेर आहे आणि येथील चाहते खेळासोबत लुडबूड केलेली खपवून घेत नाहीत. वानखेडेवर अनेक दिग्गजांना चाहत्यांच्या टीकेला सामोरे जावे लागले आहे.

युवराज सिंग२००८ साली मुंबईवर एका धावेने बाजी मारल्यानंतर युवराज सिंगने आक्रमकपणे विजयाचा जल्लोष केला होता. हे प्रेक्षकांना आवडले नव्हते. त्यामुळे मुंबईच्या चाहत्यांनी युवीसह पंजाबच्या अन्य भारतीय खेळाडूंना लक्ष्य केले. दखल घेण्याची बाब म्हणजे यावेळी लोकांनी युवराजची कथित प्रेमिका अभिनेत्री दीपिका पादुकोणला त्याची बहीण म्हटले होते.

सुनील गावसकर१९८७ सालच्या विश्वचषक उपांत्य सामन्यात इंग्लंडविरुद्ध खराब फटका मारून बाद झाल्यानंतर सुनील गावसकर यांना घरच्याच मैदानावर चाहत्यांच्या रोषाचा सामना करावा लागला. यावेळी चाहत्यांनी मत मांडले की, गावसकर मुद्दामहून खराब फटका मारून बाद झाले, कारण कोलकाताला जाऊन भारताने अंतिम सामना खेळावा, अशी त्यांची इच्छा नव्हती. त्याचवेळी असेही वृत्त आले होते की, गावसकर कोलकातातील प्रेक्षकांशी नाराज होते. कारण, तीन वर्षांआधी कपिल देवला संघातून बाहेर करण्यासह मोहम्मद अझरुद्दीनच्या पदार्पणाच्या सामन्यात पहिला डाव उशिरा घोषित केल्याने गावसकर यांची हूटिंग झाली होती.

विराट कोहलीकोहली देशाचा गौरव आहे आणि क्रिकेटविश्वाचा दूत आहे. परंतु, २०१३ सालच्या आयपीएलमध्ये त्याला मुंबईत चाहत्यांचा राेषाचा सामना करावा लागला होता. त्यावेळी वानखेडे स्टेडियमवर ‘चीटर कोहली’ असे नारेही देण्यात आले होते. मुंबईविरुद्धच्या सामन्यादरम्यान कोहलीने अंबाती रायुडूला धावबाद करण्यासाठी थेट यष्ट्यांचा अचूक वेध घेतला. मात्र, यावेळी बंगळुरूचा गोलंदाज विनय कुमारला धडकल्याने रायुडूची बॅट हवेत राहिली होती. चाहत्यांना ही गोष्ट आवडली नाही आणि त्यांनी कोहलीला लक्ष्य केले. यावर कोहली म्हणाला होता की, ‘लोकांना काय चुकीचे वाटले माहीत नाही, कारण बादचा निर्णय देणे पंचांच्या हातात असते.’ हूटिंगबाबत त्याने म्हटले की, ‘हे थोडे विचित्र वाटते. कारण, अखेर तुम्ही भारतासाठी खेळता आणि येथे तुम्ही द्वेषासाठी येत नाही.’ यानंतर पुढील वर्षी पुन्हा मुंबई-बंगळुरू सामन्यात मिचेल स्टार्क आणि किएरॉन पोलार्ड यांच्यातील वादाने सामना गाजला. मात्र, वानखेडेवर लोकांनी पुन्हा कोहलीला लक्ष्य करताना ‘अनुष्का.. अनुष्का..’ असे नारे दिले होते. त्यावेळी दोघांचा विवाह झाला नव्हता.

सचिन तेंडुलकर २००६ वर्ष सचिन तेंडुलकरसाठी अत्यंत खराब ठरले होते. सातत्याने झालेल्या दुखापतींमुळे सचिनच्या कामगिरीवर मोठा परिणाम झाला होता. भारत-इंग्लंड कसोटी सामन्यात शेवटच्या दिवशी भारताला विजयासाठी ४०० धावांचे लक्ष्य मिळाले होते. अशावेळी चाहत्यांना सचिनकडून मोठ्या अपेक्षा होत्या. परंतु, सचिन २१ चेंडूंत एक धाव काढून परतला. निराश सचिन तंबूत परतला. यावेळी चाहत्यांनी ‘एंडुलकर’ असे बोलत सचिनला लक्ष्य केले होते. 

टॅग्स :हार्दिक पांड्यामुंबई इंडियन्सट्रोलआयपीएल २०२४