Join us  

खूप साधारण नेतृत्व, साधारण गोलंदाजी; कर्णधार हार्दिक पांड्यावर गावसकर संतापले

मुंबईचे नेतृत्व सांभाळल्यापासून हार्दिकला चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2024 10:27 AM

Open in App

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : यंदाच्या आयपीएलमध्ये चौथा पराभव पत्करावा लागल्यानंतर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्यावर चाहत्यांनी टीकेची झोड उठवल्यानंतर भारताचे माजी दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनीही हार्दिकवर टीका केली. त्यांनी, 'खूप साधारण गोलंदाजी आणि साधारण नेतृत्व' असे म्हणत हार्दिकवर टीका केली. मुंबईचे नेतृत्व सांभाळल्यापासून हार्दिकला चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. रविवारी चेन्नईकडून २० धावांनी पराभव झाल्यानंतर हार्दिकवर गावसकर यांच्यासह इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसननेही टीका केली. 

गावसकर यांनी म्हटले की, 'ओह, खूप साधारण गोलंदाजी, साधारण नेतृत्व. शिवम दुबे ऋतुराज गायकवाड यांनी खूप चांगली फलंदाजी केल्यानंतरही चेन्नईला कमी धावसंख्येत रोखणे शक्य होते. माझ्या मते, त्यांना १८५-१९० धावांपर्यंत रोखता आले असते. कदाचित मी गेल्या मोठ्या कालावधीनंतर खूप खराब गोलंदाजी पाहिली.'

पीटरसन म्हणाला की, 'खेळाच्या बाहेरील गोष्टींमुळे हार्दिकच्या कामगिरीवर परिणाम होत आहे. नाणेफेकीदरम्यान हार्दिक खूप स्मितहास्य करतो. तो खुश असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करतो. पण तो खुश नाहीए. असा प्रसंग माझ्यासोबतही झाला होता. मी अशा गोष्टींचा सामना केला आहे आणि त्यामुळेच अशा गोष्टींचा आपल्या कामगिरीवर परिणाम होतो, हे मी ठामपणे सांगू शकतो. धोनीने हार्दिकविरुद्ध षटकार ठोकल्यानंतर चाहत्यांनी आनंद व्यक्त केला. यामुळे खेळाडू म्हणून दुःख होते. तो एक भारतीय खेळाडू आहे आणि त्याच्यासोबत अशा प्रकारचे व्यवहार होणे त्याला नक्कीच आवडणार नाही. त्यामुळेच त्याच्या कामगिरीवरही परिणाम होत आहे.' 

टॅग्स :हार्दिक पांड्यासुनील गावसकरआयपीएल २०२४मुंबई इंडियन्स