Join us  

Sanju Samson Controversy : हे वागणं बरं नव्हं! सॅमसनचा पारा चढला पण झाली मोठी कारवाई

IPL 2024 Updates : सध्या आयपीएलच्या सतराव्या हंगामाचा थरार रंगला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2024 11:55 AM

Open in App

सध्या आयपीएलच्या सतराव्या हंगामाचा थरार रंगला आहे. मंगळवारी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर यजमान दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना झाला. (IPL 2024) आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील ५६ व्या सामन्यात राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनला मोठा फटका बसला. त्याला आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल दंड ठोठावण्यात आला आहे. राजस्थान रॉयल्सच्या कर्णधाराला मॅच फीच्या ३० टक्के दंड भरावा लागणार आहे. (IPL 2024 News) 

आयपीएलने अधिकृत माहिती देताना सांगितले की, राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने आयपीएल आचारसंहितेच्या कलम २.८ अंतर्गत लेव्हल १ चा गुन्हा केला आहे. त्याने चूक स्वीकारली आहे. आचारसंहितेच्या लेव्हल १ च्या भंगामुळे त्याच्यावर कारवाई करण्यात आली. पंचांचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक असतो. आचारसंहितेच्या लेव्हल १ साठी मॅच रेफरीचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक असतो पण त्याने सामन्यादरम्यान तो मान्य केला नाही.  

सॅमसनचा पारा चढलाशांत स्वभावासाठी ओळखला जाणारा संजू मैदानातील पंचांशी भिडला. त्याने रिप्ले नीट पाहिल्यावर देखील तो सीमारेषेवर सहज झेलबाद झाला. या वादग्रस्त निर्णयानंतर त्यांचा संयम सुटला. संजू सॅमसनने या सामन्यात ४६ चेंडूत ८६ धावांची शानदार खेळी केली. २२२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सला विजयाची संधी देणारी ही खेळी होती. त्याचा डाव सहा षटकार आणि आठ चौकारांनी सजला पण दिल्लीने राजस्थानच्या तोंडचा घास हिसकावला. संजूला बाद करणे हा सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरला. संजूला ४६ चेंडूंत ८ चौकार व ६ षटकारांच्या मदतीने ८६ धावांवर माघारी जावे लागले. 

सामन्यानंतर संजू सॅमसन म्हणाला, सामना आमच्या हातात होता. १०-११ च्या सरासरीने धावा करायच्या होत्या आणि त्या शक्य होत्या, परंतु आयपीएलमध्ये अशा गोष्टी घडतात. नाणेफेकीच्या निर्णयावर संजू म्हणाला, आम्ही दोन्ही गोष्टी चांगल्या केल्या. या परिस्थितीत काय करता येईल, यावर आम्हाला काम करायचं होतं. दिल्लीच्या फलंदाजांनी चांगली खेळी केली. त्यांच्या सलामीवीरांनी चांगली सुरुवात करून दिली, अश्विनने आम्हाला विकेट मिळवून दिली. डेथ ओव्हरमध्ये आम्ही जास्त धावा दिल्या, असे मला वाटतं. आम्ही तीन सामने हरलो, परंतु ते अटीतटीचे होते. ही स्पर्धा तुम्हाला रिलॅक्स होण्याची संधी देत नाही.  

टॅग्स :संजू सॅमसनराजस्थान रॉयल्सआयपीएल २०२४