Sanjiv Goenka vs KL Rahul : आयपीएलमधील लखनौ सुपर जायंट्स संघाचे मालक संजीव गोएंका मागील दोन दिवसांपासून चर्चेत आहेत. त्यांनी लखनौचा कर्णधार लोकेश राहुलसोबत सामन्यानंतर साधलेला संवाद टीकाकारांना आमंत्रण देत आहे. बुधवारी सनरायझर्स हैदराबादने आपल्या घरच्या मैदानावर लखनौ सुपर जायंट्सचा दारूण पराभव केला. ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा यांच्या स्फोटक खेळीच्या जोरावर यजमान हैदराबादने १० गडी राखून विजय साकारला. पाहुण्या लखनौने दिलेल्या १६६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादची सलामी जोडी पाहुण्यांना भारी पडली. लखनौच्या दारूण पराभवानंतर संघाचे मालक संजीव गोएंका हताश दिसले. त्यांनी सामना संपताच कर्णधार लोकेश राहुलवर राग काढल्याचे पाहायला मिळाले. लखनौ सुपर जायंट्सच्या मानहानीकारक पराभवानंतर संघ मालक संजीव गोएंका प्रचंड (LSG owner Sanjiv Goenka) नाराज दिसले आणि ते सामन्यानंतर रागात कर्णधार लोकेश राहुलशी चर्चा करताना दिसले.
लखनौच्या गोलंदाजांची धुलाई होताना कॅमेरा जेव्हा जेव्हा गोएंका यांच्याकडे वळला, तेव्हा ते संतापलेले, हतबल झालेले दिसले आणि सामन्यानंतर ते लोकेश राहुलसोबत बोलतानाही रागात असल्याचे फोटोतून अंदाज बांधला जात आहे. संजीव गोएंका यांच्यावर टीका होत असताना आता भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने देखील नाराजी व्यक्त करत टीकेचे बाण सोडले.
मोहम्मद शमीचे टीकेचे बाण
शमी म्हणाला की, खेळाडूंना आदर देणे गरजेचे असते. त्यांनी राहुलला थोडी तरी रिस्पेक्ट द्यायला हवी होती... ते संघमालक असताना असे वागतात हे अत्यंत चुकीचे आहे. तुम्हाला कोट्यवधी लोक पाहत आहेत, यातून काहीतरी शिकत आहेत. जर अशा गोष्टी खुलेआम होत असतील तर मला वाटते की त्यांना लाज वाटायला हवी. हे असे व्हायला नको हवे होते. जर तुम्हाला याबद्दल चर्चा करायची असेल तर यासाठी खूप वेगवेगळे मार्ग आहेत. ड्रेसिंग रूममध्ये चर्चा केली जाऊ शकते. शमी 'क्रिकबज'च्या एका कार्यक्रमात बोलत होता.
तसेच लोकेश राहुल हा केवळ खेळाडू नसून एक कर्णधार आहे. चूक झाली असली तरी ती संपूर्ण संघाची आहे. जर तुमच्या नियोजनानुसार काही झाले नसेल तर सगळी चूक कर्णधाराची नसते. हा खेळ आहे, इथे काहीही होऊ शकते. चांगले वाईट दिवस येत असतात... पण खेळाडूंचा देखील आदर करायला हवा. मैदानात जे काही झाले त्याने एक चुकीचा मेसेज गेला आहे. हे असे झाल्याने तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत, असेही शमीने सांगितले.