Join us  

Rishabh Pant ला वर्ल्ड कपसाठी भारतीय संघात संधी मिळायला हवी; पाँटिंगन समजावलं गणित

T20 World Cup 2024: सध्या आयपीएलच्या सतराव्या हंगामाचा थरार रंगला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2024 1:42 PM

Open in App

Rishabh Pant News: येत्या जूनमध्ये होणाऱ्या ट्वेंटी-२० विश्वचषकासाठी दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंत सज्ज असल्याचे संकेत प्रशिक्षक रिकी पाँटिंगने दिले आहेत. सध्या आयपीएलच्या सतराव्या हंगामाचा थरार रंगला असून, पंतच्या नेतृत्वात दिल्लीचा संघ संघर्ष करत आहे. अद्याप दिल्ली प्लेऑफच्या शर्यतीत कायम असली तरी आव्हान मोठे असणार आहे. जून महिन्यात वेस्ट इंडिज आणि अमेरिकेच्या धरतीवर ट्वेंटी-२० विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. यासाठी रिषभ पंतला भारतीय संघात जागा मिळावी असे मत रिकी पाँटिंगने व्यक्त केले.   

पाँटिंग म्हणाला की, पंत भारतीय संघात असावा ही सर्वांचीच इच्छा आहे. तो एक अप्रतिम खेळाडू असून भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावू शकतो. तो चांगल्या फॉर्ममध्ये देखील आहे. मोठ्या कालावधीनंतर पुनरागमन करत असला तरी त्याचे काही नुकसान झाले आहे असे मला वाटत नाही. यष्टीरक्षक म्हणूनही तो प्रभावी कामगिरी करत आहे. भीषण अपघातानंतर पंत क्रिकेटच्या मैदानात परतल्याने मला आनंद वाटला. त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा आनंद दिसला ही एक मोठी गोष्ट आहे. 

जूनमध्ये विश्वचषकाचा थरार  'स्पोर्ट्स स्टार'ने दिलेल्या वृत्तानुसार आयपीएलमधील 'इम्पॅक्ट प्लेअर' हा नियम आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नाही हे योग्य असल्याने पाँटिंगने सांगितले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इम्पॅक्ट प्लेअर असावा ही बाब मला खटकते. पण, याचा अर्थ असा नाही की मी या नियमाच्या विरोधात आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तगडे संघ मजबूत प्लेइंग इलेव्हनसह मैदानात असतात. विश्वचषकासाठी १५ खेळाडूंची निवड केली जाते आणि त्यातूनच तुम्हाला संघ निवडायचा असतो. मला वाटते की, जो संघ अधिक प्रभावशाली क्रिकेट खेळेल तो नक्कीच ट्रॉफी उंचावेल, असेही पाँटिंगने नमूद केले. 

दरम्यान, या महिन्याच्या अखेरिस ट्वेंटी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा होणे अपेक्षित आहे. यष्टिरक्षक-फलंदाजांच्या शर्यतीत अनेक चेहरे आहेत. यातीलच एक चेहरा म्हणजे रिषभ पंत. कर्णधार रोहित शर्मा, प्रशिक्षक राहुल द्रविड आणि निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर कोणावर विश्वास दाखवतात हे पाहण्याजोगे असेल. पण, पंत एकटा नाही. त्याला आव्हान देण्यासाठी इशान किशन, लोकेश राहुल, संजू सॅमसन हे यष्टीरक्षक फलंदाज आहेतच, परंतु यात आता ३९ वर्षीय दिनेश कार्तिकनेही दावा सांगितला आहे.

टॅग्स :रिषभ पंतट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024भारतीय क्रिकेट संघदिल्ली कॅपिटल्सआयपीएल २०२४