IPL 2024, SRH vs LSG Live Marathi : सनरायझर्स हैदराबादने इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये आतापर्यंतचा जबरदस्त खेळ करून दाखवला. लखनौ सुपर जायंट्सच्या १६५ धावांचा पाठलाग करताना SRH ने सामना पहिल्या १० षटकांत संपवला. अभिषेक शर्मा व ट्रॅव्हिस हेड यांनी संथ खेळपट्टीवरही वादळी फटकेबाजी करून संघाला पॉवर प्लेमध्ये १०७ धावा उभारून दिल्या. आयपीएल इतिहासात पॉवर प्लेमध्ये दोनवेळा १००+ धावा करणारा SRH हा पहिलाच संघ ठरला. त्यांनी याच पर्वात दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध पहिल्या सहा षटकांत सर्वाधिक १२५ धावांचा रेकॉर्ड नोंदवला होता.
SRH चा गोलंदाज भुवनेश्वर कुमार याने पॉवर प्लेमध्ये ३ षटकांत ७ धावा देऊन २ विकेट्स घेताना LSG ला जखडून ठेवले. नितिश कुमार रेड्डी व सनवीर सिंग यांनी दोन अविश्वसनीय झेल घेतले. कृणाल पांड्या ( २४) व लोकेश राहुल ( २९) यांनी ३६ धावा जोडून लखनौचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. निकोलस पूरन व आयुष बदोनी यांनी पाचव्या विकेटसाठी ५२ चेंडूंत ९९ धावा जोडून लखनौला ४ बाद १६५ धावांपर्यंत पोहोचवले. बदोनी ३० चेंडूंत ९ चौकारांसह ५५ धावांवर नाबाद राहिला, तर पूरनने २६ चेंडूंत ६ चौकार व १ षटकारासह नाबाद ४८ धावा केल्या. भुवीने ४ षटकांत १२ धावा देत २ विकेट्स घेतल्या.
LSGला आज पॉवर प्लेमध्ये फक्त २७ ( २ विकेट्स) धावा करता आल्या होत्या. त्यामुळे SRH ला १६६ धावाही जड जातील असे वाटले होत्या, परंतु अभिषेक व ट्रॅव्हिस यांनी सर्व क्रिकेट पंडितांना गप्प केले. नवीन उल हकच्या पाचव्या षटकात ट्रॅव्हिड हेडने वादळ आणले. त्याने १६ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले आणि त्यात ५ चौकार व ५ षटकारांचा समावेश होता. हेडने १८ चेंडूंत ५८ धावा कुटल्या आणि त्यात ७ चौकार ५ षटकारांचा समावेश होता. पहिल्या पॉवर प्लेमध्ये हैदराबादने १०७ धावा चढवल्या. अभिषेकने १९ चेंडूंत अर्धशतक पूर्ण करताना हेडला उत्तम साथ दिली. हेट व अभिषेक LSG च्या गोलंदाजांवर कोणतीच दया दाखवत नव्हते आणि प्रत्येक षटकात चौकार-षटकारांची आतषबाजी पाहायला मिळत होती.
SRH ने ९.४ षटकांत बिनबाद १६७ धावा करून दणदणीत विजय मिळवला. आयपीएलच्या इतिहासात १५० हून अधिक धावांच्या लक्ष्याचा पाठलाग दहा षटकांच्या आत करणारा हा पहिला संघ ठरला. अभिषेकने २८ चेंडूंत ८ चौकार व ६ षटकारांसह नाबाद ७५ धावा केल्या, तर हेडने ३० चेंडूंत ८ चौकार व ८ षटकारांसह नाबाद ८९ धावा कुटल्या. SRH ने विजयासह १४ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आणि मुंबई इंडियन्सच्या प्ले ऑफच्या आशा संपुष्टात आणल्या. आयपीएल २०२४ मध्ये प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा मुंबई हा पहिला संघ ठरला.