Join us  

IPL 2024 RCB vs PBKS: कडक सॅल्युट! विराटनं इतिहास रचला; असं करणारा पहिला भारतीय ठरला

IPL 2024 RCB vs PBKS: विराट कोहलीने पंजाब किंग्जविरूद्धच्या सामन्यात ऐतिहासिक कामगिरी केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2024 10:49 PM

Open in App

IPL 2024 RCB vs PBKS Live Updates In Marathi | बंगळुरू: भारतीय क्रिकेट संघाचा आघाडीचा फलंदाज विराट कोहली आताच्या घडीला क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे. विराटच्या नावावर (Virat Kohli Record) अनेक विक्रमांची नोंद आहे. आता या यादीत आणखी एका विक्रमाची भर पडली आहे. आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे (RCB vs PBKS) प्रतिनिधित्व करत असलेल्या किंग कोहलीने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. सध्या आयपीएलचा (IPL 2024 News) थरार रंगला असून किंग कोहली यामाध्यमातून चाहत्यांशी जोडला गेला आहे. आयपीएलच्या सतराव्या हंगामातील सहावा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज (PBKS vs RCB Live) यांच्यात होत आहे. आरसीबीला आपल्या सलामीच्या सामन्यात चेन्नईकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. आरसीबी यंदाच्या हंगामातील दुसरा सामना आपल्या घरच्या मैदानावर खेळत आहे.

खरं तर विराट कोहली ट्वेंटी-२० मध्ये १०० हून अधिकवेळा ५० पेक्षा जास्त धावा करणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याने पंजाब किंग्जविरूद्धच्या सामन्यात अर्धशतकी खेळी करून ही किमया साधली. आपला संघ अडचणीत असताना विराटने अप्रतिम खेळी करून डाव सावरला. पंजाबविरूद्ध त्याने २ षटकार आणि ११ चौकारांच्या मदतीने ४९ चेंडूत ७७ धावा कुटल्या. 

आरसीबीचा कर्णधार फाफ डुप्लेसिसने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना पंजाबला जॉनी बेअरस्टोच्या रूपात सुरुवातीलाच मोठा झटका बसला. त्यानंतर कर्णधार शिखर धवनने मोर्चा सांभाळला. त्याने सावध खेळी करत डाव पुढे नेला, ज्याला सिमरन सिंगने साथ दिली. पंजाबकडून शिखर धवनने सर्वाधिक (४५) धावा केल्या, तर जॉनी बेअरस्टो (८), सिमरन सिंग (२५), लियाम लिव्हिंगस्टोन (१७), सॅम करन (२३), जितेश शर्माने (२७) धावा केल्या. अखेरीस शशांक सिंगने २० चेंडूत २७ धावांची नाबाद खेळी केली. प्रथम फलंदाजी करताना पंजाबने निर्धारित २० षटकांत ६ बाद १७६ धावा केल्या. 

पंजाब किंग्जचा संघ -शिखर धवन (कर्णधार), जॉनी बेयरस्टो, सॅम करन, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), हरप्रीत बरार, हर्षल पटेल, कगिसो रबाडा, राहुल चाहर, अर्शदीप सिंग आणि शशांक सिंग. 

बंगळुरूचा संघ -फाफ डु प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, कॅमरून ग्रीन, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), अनुज रावत, कर्ण शर्मा, अल्झारी जोसेफ, मयंत डागर आणि मोहम्मद सिराज. 

टॅग्स :विराट कोहलीपंजाब किंग्सरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरआयपीएल २०२४टी-20 क्रिकेट