Join us  

IPL 2024: हार्दिकला ट्रोल करणाऱ्यांचे अश्विनने टोचले कान; फिरकीपटूने दिले 'भारी' उदाहरण

Hardik Pandya Troll: सध्या हार्दिक पांड्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2024 5:00 PM

Open in App

मुंबई इंडियन्सचा कर्णधार बनल्यापासून हार्दिक पांड्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. सोशल मीडियावर चाहते त्याच्यावर टीका करताना दिसले. याशिवाय मुंबईचा सलामीचा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झाला. इथे देखील त्याला चाहत्यांच्या रोषाचा सामना करावा लागला. रोहित शर्माला कर्णधारपदावरून काढल्यामुळे माजी कर्णधार विरूद्ध विद्यमान कर्णधार असे वातावरण तयार करण्यात आले आहे. यावर माजी क्रिकेटपटू वारंवार प्रतिक्रिया देत असून चाहत्यांना शांत राहण्याचा सल्ला देत आहेत. आता भारताचा स्टार फिरकीपटू आर अश्विनने याप्रकरणी भाष्य केले आहे. (Hardik Pandya Trolling) 

गुजरात टायटन्सचे कर्णधारपद असताना देखील हार्दिकने मुंबईच्या संघात का घरवापसी केली असावी असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. मुंबईला यंदाच्या हंगामातील आपल्या सुरुवातीच्या दोन सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला. हार्दिक विरूद्ध रोहित या वादावर बोलताना आर अश्विनने अतिउत्साही चाहत्यांचे कान टोचले आहेत. 

अश्विनने दिले 'भारी' उदाहरण 

अश्विन म्हणाला की, क्रिकेटमध्ये हे सर्वकाही सुरू असते, धोनी विरूद्ध विराट असाही वाद निर्माण केला जात होता. पण, मला वाटते की चाहत्यांना एखादा खेळाडू आवडत नसेल आणि ते त्याला ट्रोल करत असतील तर यावर एखाद्या संघाने कशाला स्पष्टीकरण द्यायला हवे. हे मला समजत नाही. हे या आधी झाले नाही का? सचिन तेंडुलकर सौरव गांगुलीच्या नेतृत्वात खेळला आहे, हे दोघेही राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली खेळले आहेत. तसेच हे तिघेही कुंबळेच्या नेतृत्वाखाली खेळले आहेत आणि हे सर्व धोनीच्या हाताखाली खेळले आहेत. जेव्हा ते एमएसच्या नेतृत्वाखाली खेळत होते तेव्हा हे खेळाडू क्रिकेटमधील दिग्गज होते. अश्विन त्याच्या युट्यूब चॅनेलवर बोलत होता. 

हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्सने आतापर्यंत केवळ दोन सामने खेळले आहेत. दोन्ही सामन्यांमध्ये मुंबईला पराभव पत्करावा लागला. कर्णधार म्हणून हार्दिक पांड्या अपयशी ठरल्याचे दिसले. जसप्रीत बुमराहला पहिले षटक का दिले जात नाही असा प्रश्न जाणकारांनी उपस्थित केला. मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामना ऐतिहासिक ठरला. या सामन्यात यजमान हैदराबादच्या संघाने आयपीएलच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या उभारली. त्यांनी निर्धारित २० षटकांत ३ बाद २७७ धावा करून इतिहास रचला.

टॅग्स :हार्दिक पांड्याआर अश्विनमुंबई इंडियन्सरोहित शर्माआयपीएल २०२४