Join us  

IPL 2024: IPL मध्ये पहिल्यांदाच दिसणारे शिलेदार! वर्ल्ड कप गाजवणारेही मैदानात; जाणून घ्या टॉप-५

अलीकडेच आयपीएल २०२४ साठी खेळाडूंचा मिनी लिलाव पार पडला.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2023 1:23 PM

Open in App

IPL 2024 Auction: जगातील सर्वात लोकप्रिय ट्वेंटी-२० लीगमध्ये अर्थात आयपीएलमध्ये खेळण्याची प्रत्येक क्रिकेटपटूची इच्छा असते. अलीकडेच आयपीएल २०२४ साठी खेळाडूंचा मिनी लिलाव पार पडला. एकूण ७२ खेळाडूंची १० फ्रँचायझींनी २३० कोटीत खरेदी केली. या ७२ खेळाडूंमध्ये असे अनेक खेळाडू आहेत ज्यांच्या नावावर पहिल्यांदाच बोली लावली गेली आणि पहिल्यांदाच त्यांची विक्री झाली. आयपीएल २०२४ मध्ये पदार्पण करू शकणार्‍या टॉप-५ शिलेदारांबद्दल आपण जाणून घेणार आहोत. यामध्ये दोन अनकॅप्ड भारतीय खेळाडूंच्याही नावाची नोंद आहे. 

  1. कुमार कुशाग्र (भारत) - भारताचा अनकॅप्ड खेळाडू कुमार कुशाग्रवर दिल्ली कॅपिटल्सच्या फ्रँचायझीने ७.२० कोटींचा वर्षाव केला. यष्टीरक्षक फलंदाजाला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी दिल्लीच्या फ्रँचायझीने सुरूवातीपासूनच प्रयत्न केले. सौरव गांगुलीने झारखंडच्या या खेळाडूला वचन दिले होते की, लिलावात त्याच्यासाठी १० कोटी रुपयांची बोली लागली तरी तो दिल्ली कॅपिटल्सकडून नक्कीच खेळेल.
  2. समीर रिझवी (भारत) - चेन्नई सुपर किंग्सच्या पर्समध्ये ११.६० कोटी शिल्लक होते आणि त्यापैकी ८.४० कोटी CSK ने समीर रिझवीसाठी मोजले. चेन्नईच्या फ्रँचायझीने मोठी रक्कम मोजल्यानंतर समीर चर्चेत आला. २० लाख मूळ किंमत असलेल्या समीरसाठी गुजरात टायन्स व चेन्नई सुपर किंग्स यांनी बोली लावली होती. पण, अखेर तो चेन्नईच्या संघाचा भाग झाला. 
  3. गेराल्ड कोएत्झी (दक्षिण आफ्रिका) - वन डे विश्वचषकात प्रभावी कामगिरी केल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज गेराल्ड कोएत्झीला आयपीएलच्या लिलावात चांगला भाव मिळाला. कोएत्झीला मुंबई इंडियन्सने ५ कोटी रूपयांत खरेदी  केले. त्यामुळे तो जसप्रीत बुमराहसोबत मुंबईच्या गोलंदाजीची धुरा सांभाळेल हे जवळपास निश्चित झाले आहे.
  4. दिलशान मदुशंका (श्रीलंका) - या यादीत पुढच्या क्रमांकावर श्रीलंकेचा दिलशान मदुशंका आहे. श्रीलंकेच्या डावखुऱ्या गोलंदाजावर मुंबई इंडियन्सने ४.६० कोटी ओतले. नुकत्याच झालेल्या वन डे विश्वचषकात दिलशानने श्रीलंकेसाठी सर्वाधिक बळी घेतले होते. 
  5. रचिन रवींद्र (न्यूझीलंड) - रचिन रवींद्रने वन डे विश्वचषकात न्यूझीलंडकडून चमकदार कामगिरी केली. त्याने आपल्या संघाकडून सर्वाधिक धावा केल्या याशिवाय काही बळी देखील घेतले. आयपीएल २०२४ साठी झालेल्या लिलावात या खेळाडूला चेन्नई सुपर किंग्जने १.८० कोटी रुपयांना खरेदी केले. 

 

टॅग्स :आयपीएल २०२३आयपीएल लिलावमुंबई इंडियन्सचेन्नई सुपर किंग्सदिल्ली कॅपिटल्स