IPL 2024, Kolkata Knight Riders vs Punjab Kings Marathi Live : कोलकाताच्या ईडन गार्डनवर आज सुनील नरीन व फिल सॉल्ट यांच्या दे दना दन फटकेबाजीने मैदान दणाणून सोडले. यांनी घातलेल्या मजबूत पायावर कोलकाता नाईट रायडर्सच्या अन्य फलंदाजांनीही धावांचे इमले रचले. पंजाब किंग्सच्या गोलंदाजांची अवस्था आज फार वाईट झालेली दिसली. KKR ने ईडन गार्डनवरील ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या आज नोंदवली.
नरीन व सॉल्ट या दोघांनी पहिल्या १० षटकांत १३७ धावा चोपल्या आणि KKR ची आयपीएल इतिहासातील पहिल्या १० षटकांतील सर्वोत्तम कामगिरी ठरली. PBKS ने नाणेफेक जिंकून जेव्हा प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला तेव्हा अनेक तज्ज्ञांनी आश्चर्य व्यक्त केले. नरीन व सॉल्ट यांनी अनुक्रमे २४ व २५ चेंडूंत वैयक्तिक अर्धशतकं पूर्ण केली. या दरम्यान PBKS च्या खेळाडूंनी तीन झेल टाकले. नरीन ३२ चेंडूंत ९ चौकार व ४ षटकारांसह ७१ धावांवर बाद झाला. सॉल्ट ३७ चेंडूंत ६ चौकार व ६ षटकारांसह ७५ धावांवर बाद झाला.
ईडन गार्डनवर आयपीएल इतिहासात सर्वाधिक १३८ धावांच्या भागीदारीचा विक्रम आज सॉल्ट व नरीन यांनी नोंदवला. २०१६ मध्ये युसूफ पठाण व शाकिब अल हसन यांनी गुजरात लायन्सविरुद्ध १३४ धावा जोडल्या होत्या. या दोन सेट फलंदाजांच्या फटकेबाजीचा पाढा वेंकटेश अय्यर व आंद्रे रसेल यांनी पुढे सुरू ठेवला. पण, अर्शदीप सिंगने बाऊन्सवर रसेलला ( २४) चूक करण्यास भाग पाडले आणि १५.३ षटकांत २०३ धावांवर तिसरी विकेट मिळवून दिली. वेंकटेश व श्रेयस अय्यर यांच्या फटकेबाजीने कोलकाताचे ईडन गार्डन पुन्हा नाचू लागले. अय्यर १० चेंडूंत १ चौकार व ३ षटकारांसह २८ धावांवर बाद झाला.
वेंकटेशने रसेल व अय्यर यांच्यासोबत प्रत्येकी १८ चेंडूंत अनुक्रमे ४० व ४३ धावांची भागीदारी केली. रिंकू सिंग ५ धावांवर झेलबाद झाला. वेंकटेश २२ चेंडूंत ३९ धावांवर नाबाद राहिला आणि KKR ने ६ बाद २६१ धावा उभारल्या.