IPL 2024, Kolkata Knight Riders vs Punjab Kings Marathi Live : इंडियन प्रीमिअर लीग २०२४ च्या प्ले ऑफच्या दिशेने मजबूत पाऊल टाकण्याची कोलकाता नाईट रायडर्ससमोर आज चांगली संधी आहे. ७ सामन्यांत ५ विजय मिळवून १० गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या KKR ला आज गुणतालिकेत नवव्या क्रमांकावर असलेल्या पंजाब किंग्सचा सामना करायचा आहे. PBKS ला स्पर्धेत राहायचे असल्यास आता उर्वरित ६ सामने जिंकणे गरजेचे आहे. त्यामुळे ते KKR ला कशी टक्कर देतात याची उत्सुकता आहे. KKR-PBKS यांच्या आतापर्यंत झालेल्या ३२ सामन्यांपैकी २१ मध्ये कोलकाता फ्रँचायझीने बाजी मारली आहे. पंजाबला ११ सामने जिंकता आले आहेत.
सुनील नरीनने आयपीएलमध्ये पंजाब किंग्सविरुद्ध सर्वाधिक ३३ विकेट्स घेतल्या आहेत आणि त्यांच्याविरुद्ध नरीनची सरासरी ही १९.९० अशी आहे, तर इकॉनॉमी ७.०६ आहे. या सामन्यात श्रेयस अय्यर विरुद्ध कागिसो रबाडा हा सामनाही रंगतदार असेल. रबाडाला एकदाही अय्यरला बाद करता आलेले नाही. पंजाब किंग्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला, आजही टॉससाठी सॅम कुरन आल्याने शिखर धवन मुकणार असल्याचे स्पष्ट झाले. लिएम लिव्हिंगस्टनच्या जागी आज जॉनी बेअरस्टो पंजाबच्या संघात परतला आहे. २४.७५ कोटींत खरेदी केलेल्या मिचेल स्टार्कने KKR ला निराश केले आहेत. त्याला ११.४८च्या इकॉनॉमीने ६ विकेट्स घेता आल्या आहेत. दुखापतीमुळे स्टार्कला आज मुकावे लागले आणि दुश्मंथा चमिरा आज खेळणार आहे.
सुनील नरीन आणि फिल सॉल्ट यांनी आक्रमक फटकेबाजी करताना ३.५ षटकांत फलकावर पन्नास धावा चढवल्या. पहिल्या षटकात सहा धावा जमवल्यानंतर नरीन व सॉल्ट यांनी वादळी खेळी केली. पॉवर प्लेमध्ये KKR च्या दोन्ही फलंदाजांचे कॅच सोडल्याचा PBKS ला पश्चाताप होत असावा आणि KKR ने ७६ धावा उभ्या केल्या. इडन गार्डनवरील ही पॉवर प्लेमधील दुसरी सर्वोत्तम खेळी ठरली. ७व्या षटकात डावातील तिसरा झेल पंजाबच्या खेळाडूने टाकला. नरीनने २४ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले.