Join us  

आयपीएल २०२४ चा 'Impact' चुकतोय! भारताच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप तयारीत अडथळा ठरतोय

इंडियन प्रीमिअर लीग २०२४ चे चाळीस सामने काल पूर्ण झाले. दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातल्या सामन्यात पुन्हा एकदा ४४४ धावा कुटल्या गेल्या.

By स्वदेश घाणेकर | Published: April 25, 2024 8:11 AM

Open in App

- स्वदेश घाणेकर

इंडियन प्रीमिअर लीग २०२४ चे चाळीस सामने काल पूर्ण झाले. दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातल्या सामन्यात पुन्हा एकदा ४४४ धावा कुटल्या गेल्या. यंदाची आयपीएल ही अनेक विक्रम मोडणारी ठरतेय, विशेषतः फलंदाजीत... सनरायझर्स हैदराबादचे फलंदाज बॅट नव्हे जणूच बेसबॉल बॅट म्हणजेच 'Lumber' घेऊन खेळत आहेत का, असा भास होतोय... आला चेंडू मारला सीमापार... हेच सूत्र त्यांनी अवलंबिले आहे. RCB vs SRH ( ५४९) आणि SRH vs MI ( ५२३) यांच्या लढतीत तर पाचशेपार धावा कुटल्या गेल्या, तर ८ सामन्यांत चारशे पार, १६ वेळा ३५० पार धावा झालेल्या पाहायला मिळाल्या आहेत. आयपीएल इतिहासात पहिल्या ४० सामन्यांत कधी नव्हे इतक्या धावा झाल्या, सर्वाधिक ७१२ षटकार व १२३१ चौकार पाहायला मिळाले... पण, ही आकडेवारी टीम इंडियाच्या वर्ल्ड कप संघ निवडीसाठी अडचणीची ठरतेय...

आयपीएल २०२४च्या कामगिरीवर टीम इंडियाची निवड समिती बारीक लक्ष ठेवून आहे. रोहित शर्माला अपेक्षित सूर गवसला नसला तरी त्याच्या नेतृत्वाखाली संघ खेळेल हे बीसीसीआय सचिव जय शाह यांनी आधीच जाहीर केले आहे. पण, याच रोहितने Impact Player या नियमावर नाराजी व्यक्त करून संभाव्य धोका लक्षात आणून दिला आहे.

 

  • रोहित शर्मा - "मी Impact Player नियमाचा फार मोठा चाहता नाही".
  • मोहम्मद सिराज - "कृपया Impact Player नियम काढून टाका, गोलंदाजांसाठी काहीही नाही".
  • मुकेश कुमार - "एकतर खेळपट्ट्या बदलल्या पाहिजेत किंवा १२ खेळाडूंना परवानगी देऊ नये. Impact Player  नियमामुळे फलंदाज बाद होण्यास घाबरत नाहीत".

हा काही इम्पॅक्ट प्लेअर नियमाबाबत मागील काही दिवसांत व्यक्त झालेल्या प्रतिक्रिया... या नियमामुळेच फलंदाजांची ताकद बळावली आहे आणि धावांचा पाऊस पाडला जात आहे. त्यामुळे आयपीएल ही फक्त फलंदाजांचीच होऊन बसली आहे. गोलंदाजांना इथे काहीच वाव मिळताना दिसत नाही. इथे संघ सहज अडीचशेपार धावा करून जात आहेत. २८७ धावाही संघाला विजय मिळवून देण्यासाठी पुरेशा वाटत नाही आणि यात इम्पॅक्ट प्लेअऱ या नियमाचा खूप मोठा वाटा आहे. सध्या संघ सोईनुसार खरं तर प्लानिंग करून फलंदाजाला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानावर रिप्लेस करत आहेत. त्यामुळे गोलंदाजाचे मरण होतेच, पण खरा बळी हा अष्टपैलू अर्थात ऑल राऊंडरचा जाताना दिसतोय...

 

हार्दिक पांड्या, शिवम दुबे सारखे ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी चर्चेत असलेली नावे पुरेशी गोलंदाजी करू शकत नाही. हार्दिकने ८ सामन्यांत १५१ , तर शिवमने ८ सामन्यांत ३११ धावा केल्या आहेत. रवींद्र जडेजानेही ८ सामन्यांत १५७ धावा केल्या आहेत, परंतु त्याला केवळ ४ विकेट्स घेता आल्या आहेत. हार्दिकच्या नावावरही ४ विकेट्स आहे, तर शिवमने अद्याप एकही षटक फेकलेलं नाही. CSK सध्या त्याचा वापर इम्पॅक्ट प्लेअर म्हणून जास्त करताना दिसत आहे. अशा परिस्थितीत टीम इंडिया वर्ल्ड कपसाठी ज्या ऑल राऊंडरचा शोध घेत आहे, तो त्यांना कसा मिळेल?

आयपीएलच्या इम्पॅक्ट प्लेअर नियमांचा चुकीचा 'Impact' सध्या भारतीय संघाच्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या संघ निवडीवर पडताना दिसतोय...

टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024आयपीएल २०२४हार्दिक पांड्याभारतीय क्रिकेट संघरोहित शर्माबीसीसीआय