Join us  

IPL 2024 GT vs MI: मुंबईच्या पराभवाला पांड्या जबाबदार; इरफान पठाणनं समजावलं गणित

IPL 2024 GT vs MI Live Score Card: गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सचा ६ धावांनी पराभव केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2024 11:54 PM

Open in App

IPL 2024 GT vs MI Live Updates In Marathi | अहमदाबाद: मुंबई इंडियन्सचा गुजरात टायटन्सने ६ धावांनी पराभव केला. मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स (GT vs MI) यांच्यातील लढत नाना कारणांनी महत्त्वाची ठरली. दोन्हीही संघ नवीन कर्णधारांच्या नेतृत्वात होते. गुजरात टायटन्सचा माजी कर्णधार हार्दिक पांड्या मुंबईचा विद्यमान कर्णधार आहे, तर शुबमन गिल प्रथमच कर्णधापद सांभाळत आहे.

गुजरातने दिलेल्या १६९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईला इशान किशनच्या रूपात सुरुवातीलाच मोठा झटका बसला. नंतर नमनने मुंबईचा मोर्चा सांभाळत काहीसा धीर दिला. रोहित शर्माने आपल्या अनुभवाचा फायदा घेत सावध खेळी केली आणि डाव सावरला. मात्र, ही जोडी तंबूत परतल्यानंतर यजमानांनी पुनरागमन केले. पण डेव्हाल्ड ब्रेव्हिस मैदानात आला आणि त्याने 'इम्पॅक्ट' पाडला. तो बाद झाल्यानंतर सामन्यात रंगत आली. 

इरफान पठाणनं समजावलं गणित

लक्षणीय बाब म्हणजे हार्दिक पांड्याच्या आधी टीम डेव्हिड फलंदाजीला आला, जो फिरकीपटूचा सामना करण्यात अपयशी ठरला. याचाच दाखला देत इरफान पठाणने म्हटले की, राशिद खानचे एक षटक बाकी असताना टीम डेव्हिड हार्दिकच्या आधी फलंदाजीला का आला होता? फिरकीपटूविरूद्ध कोणत्याही दिवशी मी तरी भारतीय फलंदालाच प्राधान्य देईन. एकूणच राशिदचा सामना करण्यासाठी डेव्हिडच्या जागी हार्दिकने फलंदालीला यायला हवे होते, असे इरफान पठाणने म्हटले. 

मुंबईला अखेरच्या १२ चेंडूत विजयासाठी २७ धावांची आवश्यकता होती. एकोणिसाव्या षटकातील पहिल्याच चेंडूवर तिलक वर्माने षटकार ठोकला पण त्याच्या पुढच्याच चेंडूवर तो बाद झाला. आता १० चेंडूत २१ धावांची आवश्यकता होती. मग पुढच्या दोन चेंडूवर १-१ धाव काढण्यात मुंबईला यश आले. १९ व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर गेराल्ड कोएत्झीला बाद करून यजमानांनी सामना आपल्या बाजूला फिरवला.

अखेरच्या षटकात मुंबईला विजयासाठी १९ धावांची गरज होती. स्ट्राईकवर कर्णधार हार्दिक पांड्या होता. पहिल्याच चेंडूवर पांड्याने षटकार आणि त्याच्या पुढच्या चेंडूवर चौकार ठोकला आणि सामन्यात रंगत आणली. आता ४ चेंडूत ९ धावांची गरज होती. पण चौथ्या चेंडूवर हार्दिक बाद झाला अन् पुन्हा गुजरातने पुनरागमन केले. मुंबईचा कर्णधार ४ चेंडूत ११ धावा करून तंबूत परतला. ३ चेंडूत ९ धावा हव्या असताना पियुष चावला बाद झाला. अखेरच्या षटकातील पाचव्या चेंडूवर जसप्रीत बुमराहने एक धाव काढली आणि शेवटच्या चेंडूवर देखील एक धाव मिळाली. अशाप्रकारे मुंबईने ६ धावांनी सामना गमावला. यजमान संघाने निर्धारित २० षटकांत ६ बाद १६८ धावा केल्या होत्या. त्याचा पाठलाग करताना मुंबईचा संघ निर्धारित २० षटकांत ९ बाद १६२ धावा करू शकला आणि सामना ६ धावांनी गमावला. 

टॅग्स :हार्दिक पांड्यागुजरात टायटन्समुंबई इंडियन्सआयपीएल २०२४इरफान पठाण