Join us  

इथे २८७ धावाही Safe नाहीत! गोलंदाजांची केविलवाणी अवस्था, भारताला कसा सापडणार 'बॉलिंग'स्टार?

आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत पहिल्या ४२ सामन्यातं जेवढे षटकार-चौकार पडले नसतील तेवढे यंदाच्या पर्वात म्हणजेच ७७१ सिक्स व १२९६ फोर फलंदाजांनी चेचले आहेत..

By स्वदेश घाणेकर | Published: April 27, 2024 11:19 AM

Open in App

- स्वदेश घाणेकर

''Cricket has changed. Mind set of batsmen has changed ( क्रिकेट बदललं आहे, फलंदाजांचा माईंड सेटही बदलला आहे)'' कालच्या सामन्यानंतर इरफान पठाणचं हे ट्विट अन्  “Save the bowlers” someone plsss ( गोलंदाजांना वाचवा, कृपया कुणीतरी वाचवा)'' फिरकीपटू आर अश्विननं दिलेली ही आर्त साद....

कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये ईडन गार्डनवर खेळवल्या गेलेल्या सामन्यानंतर सोशल मीडियावर अनेक दिग्गजांकडून संमिश्र प्रतिक्रिया आलेल्या पाहायला मिळाल्या. एरवी त्याची दखल घेणं तितकं महत्त्वाचं नव्हतं, परंतु आता ती घ्यावी लागतेय आणि त्यामागचं कारण ''आयपीएल २०२४ चा 'Impact' चुकतोय! भारताच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप तयारीत अडथळा ठरतोय''  या लेखात सांगण्यात आलं होतं... पण हा लेख फक्त ऑल राऊंडर अर्थात अष्टपैलूवर होणाऱ्या अन्यायाबाबत होता.. आता मात्र त्यांच्यापेक्षा अधिक दया ही गोलंदाजांची वाटू लागली आहे... 

आतापर्यंत ४२ सामने झाले, म्हणजे प्रत्येक सामन्यात सरासरी २० विकेट्स प्रमाणे ८४० विकेट्स किंवा त्याच्या आसपास पडणे अपेक्षित होते. पण, प्रत्यक्षात विकेट पडल्यात ४८६ म्हणजेच फक्त ५७ टक्के विकेट्स गोलंदाजांना घेता आल्या आहेत. आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत पहिल्या ४२ सामन्यातं जेवढे षटकार-चौकार पडले नसतील तेवढे यंदाच्या पर्वात म्हणजेच ७७१ सिक्स व १२९६ फोर फलंदाजांनी चेचले आहेत.. IPL 2024 मधील ३ सामने असे झालेत की त्यात दोन्ही संघांनी मिळून पाचशेहून अधिक धावा केल्या आहेत. त्यापैकी सर्वोत्तम धावा या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद ( ५४९) यांच्या सामन्यात झाल्या आहेत. ८ सामने असे झाले आहेत ती त्यात दोन्ही संघांनी मिळून जवळपास ४५० धावांपर्यंत मजल मारली, तर १६ सामन्यांत ३५०+ हून अधिक धावा चोपल्या गेल्या. गुजरात टायटन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्या लढतीत दोन्ही संघांना मिळून १८१ धावा केल्या आणि ही या आयपीएलमधील सर्वात कमी धावांची सरासरी आहे....

इम्पॅक्ट प्लेअर, फलंदाजांना पोषक खेळपट्ट्या... या सर्वांचा परिणाम गोलंदाजीवर होतोय आणि त्यामुळे चांगले चांगले गोलंदाज मार खाताना दिसत आहेत. यंदा गोलंदाजांची इकॉनॉमी बिघडलेली दिसतेय... सरासरी १० ते १२ च्या इकॉनॉमीने गोलंदाजांना मार पडतोय... जगातील सर्वोत्तम गोलंदाजांमध्ये ज्याची गणणा होते तो जसप्रीत बुमराह सर्वोत्तम इकॉनॉमी देणाऱ्या गोलंदाजांमध्ये आयपीएलमध्ये आठव्या क्रमांकावर आहे. युझवेंद्र चहल जो भारताचा भरवशाचा गोलंदाज आहे त्याने भले १३ विकेट्स घेतल्या असतील, परंतु त्याची इकॉनॉमी ही ८.८३ अशी राहिली आहे. अर्शदीप सिंग, आवेश खान, हार्दिक पांड्या, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा या ट्वेंटी-२० वर्ल्ड कपसाठी विचार सुरू असलेल्या गोलंदाजांची इकॉनॉमी न पाहिलेली बरी... वर्ल्ड कपमध्ये बुमराहच्या खांद्याला खांदा लावून गोलंदाजी करण्याची ताकद असणाऱ्या मोहम्मद सिराजची अवस्था तर वाईट करून ठेवली आहे...

ट्वेंटी-२०मुळे क्रिकेट झटपट झाले हे खरे आहे, पंरतु यात स्पर्धा जिवंत असल्याचे आयपीएल २०२४ कडे पाहून तरी दिसत नाही... फलंदाज येतो आडवी बॅट फिरवतो आणि चेंडू सटासट सीमापार पाठवून संघाला धावांचा एव्हरेस्ट उभा करून देतो... इथे २८७ धावाही सेफ वाटत नाही... अशी आजची परिस्थिती आहे... आयपीएल अधिक मनोरंजक करण्यासाठी हे गरजेचं आहे हे कळतंय, परंतु यात क्रिकेटचा श्वास गुदमरतोय आणि त्याचा पहिला बळी गोलंदाज ठरत आहे... खेळपट्ट्याही ही फलंदाजांना पोषक बनवण्यात येत असल्याने गोलंदाजांनी करावं तरी काय, अशी अवस्था झाली आहे. 

हे असंच सुरू राहिले तर काही दिवसांनी ''IPL 2024 मध्ये गोलंदाज हरवले आहेत, त्यांना वाचवण्याची गरज आहे'' अशी मोहीम क्रिकेटप्रेमींना उभी करावी लागू शकते...

टॅग्स :आयपीएल २०२४भारतीय क्रिकेट संघजसप्रित बुमराहमोहम्मद सिराजट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024