IPL 2024, Delhi Capitals vs Kolkata Knight Riders Live Marathi Update : सुनील नरीनने ( Sunil Narine ) आज दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांना चोपून काढले. कोलकाता नाईट रायडर्सच्या सलामीवीराने इशांत शर्माच्या एका षटकात २६ धावा कुटल्या. त्याची फटकेबाजी पाहून दिल्लीचे गोलंदाज रडकुंडीला आले. कोलकाता नाईट रायडर्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. नरीन आणि फिल सॉल्ट यांनी KKR ला स्फोटक सुरूवात करून दिली. नरीनने चौथ्या षटकात इशांत शर्माला ६,६,४,०,६,४ असे फटके खेचले. एनरिच नॉर्खियाच्या पाचव्या षटकात सॉल्ट १८ धावांवर बाद झाला आणि कोलकाताला ६० धावांवर पहिला धक्का बसला.
पण, नरीनने २१ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. त्याने ६ चौकार व ४ षटकार खेचले. त्याचा वादळी खेळ सुरूच राहिला आणि पॉवर प्लेमध्ये KKR ने १ बाद ८८ धावा कुटल्या. नरीन दिल्लीच्या एकाही गोलंदाजाला जुमानत नव्हता आणि चेंडू उत्तुंग टोलवत होता. यष्टींमागून रिषभ सीमापार जाणारे चेंडू पाहत राहिला. अंगक्रिश रघुवंशीनेही मनगटाचा सुरेख वापर करून खणखणीत षटकार खेचायला सुरुवात केले. KKR ने १० षटकांत १ बाद १३५ धावा उभ्या केल्या. नरीनचा झंझावात १३व्या षटकात थांबवण्यात मिचेल मार्शला यश आले त्याने ७ चौकार व ७ षटकारांसह ३९ चेंडूंत ८५ धावांची स्फोटक खेळी केली. अंगक्रिशसह त्याने ४८ चेंडूंत १०४ धावा जोडल्या.