Join us  

माही मार रहा है! तुफान फटकेबाजी अन् लांब केस... पुन्हा दिसला धोनीचा १९ वर्षांपूर्वीचा 'अवतार'!

MS Dhoni CSK, IPL 2024: धोनीने नाबाद ३७ धावांच्या खेळीत ४ चौकार आणि ३ षटकार लगावले.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2024 9:36 AM

Open in App

MS Dhoni Batting, IPL 2024 CSK vs DC: २००७ साली कोणाच्याही ध्यानी मनी नसताना भारतीय क्रिकेट चाहत्यांना एक सुखद धक्का बसला. पहिल्यांदाच आयोजित केलेल्या T20 World Cup मध्ये टीम इंडियाने विजेतेपद पटकावले. त्यावेळी विश्वचषक उंचावणारा लांब केसांचा महेंद्रसिंग धोनी तुम्हाला आठवत असेलच. २००५ साली धोनीने विश्वाखापट्टणमच्या मैदानात पहिलं शतक ठोकत साऱ्यांचे लक्ष वेधले होते. धोनीची फटकेबाजी, त्याचा सामना फिनिश करण्याची स्टाइल, हवेत उंच उंच जाणारे षटकार आणि हेलिकॉप्टर शॉट साऱ्याच गोष्टी त्याच्या कारकिर्दीची शोभा वाढवतात. त्याची हीच तुफान फटकेबाजी आणि वाऱ्यावर उडणारे लांब केस असा त्याचा लूक रविवारी पुन्हा भारतीय चाहत्यांना पाहायला मिळाला आणि चाहते पुन्हा एकदा धोनीच्या प्रेमात पडले.

IPL 2024 मधील रविवारच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने चेन्नई सुपर किंग्जला २० धावांनी पराभूत केले. या सामन्यात दिल्लीच्या संघाने ५ बाद १९१ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईने ६ बाद १७१ धावा केल्या. चेन्नईचा संघ पराभूत झाला असला तरी चाहते मात्र खूपच आनंदित झाले. त्यांचा लाडका धोनी जुन्या अंदाजात खेळताना दिसला. धोनीला सामन्यात संघाला विजय मिळवून देत आला नाही. पण त्याने १६ चेंडूत तब्बल ३७ धावा कुटल्या. त्याच्या खेळीत ४ चौकार आणि ३ उत्तुंग षटकारांचा समावेश होता. धोनीची ही खेळी पाहूनच चाहते त्याच्यावर पुन्हा एकदा फिदा झाले. पाहा धोनीची फटकेबाजी-

दरम्यान, चेन्नईविरूद्धच्या सामन्यात दिल्लीने २० षटकांत दमदार फटकेबाजी करत ५ बाद १९१ धावा केल्या. दिल्लीच्या डेव्हिड वॉर्नरने ३५ चेंडूत ५२ धावा केल्या. तर कर्णधार रिषभ पंतने ३२ चेंडूत ५१ धावांची खेली केली. कालच्या सामन्यात पृथ्वी शॉ ला देखील सूर गवसला. त्याने २७ चेंडूत ४३ धावा केल्या. १९२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईकडून अजिंक्य रहाणेने ३० चेंडूत ४५ धावांची खेळी केली. तर डॅरेल मिचेलने २६ चेंडूत ३४ धावा केल्या. त्यासोबतच धोनीने शेवटपर्यंत झुंज देत १६ चेंडूत नाबाद ३७ धावा केल्या. पण तरीही चेन्नईला २० धावांनी हार पत्करावी लागली.

टॅग्स :आयपीएल २०२४महेंद्रसिंग धोनीचेन्नई सुपर किंग्सदिल्ली कॅपिटल्सभारतीय क्रिकेट संघ