Join us

IPL 2023 : चला गोलंदाजानं धाडस दाखवलं, बरं वाटलं! हर्षल पटेलच्या रन आऊटच्या 'त्या' प्रयत्नाचे अश्विनकडून कौतुक

IPL 2023 RCB vs LSG : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यातला सामना कमालीचा चुरशीचा झाला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2023 16:41 IST

Open in App

IPL 2023 RCB vs LSG : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यातला सामना कमालीचा चुरशीचा झाला. हर्षल पटेलने अखेरच्या चेंडूवर नॉन स्ट्रायकर एंडवर रवी बिश्नोईला रन आऊट करण्याचा प्रयत्न फसला अन् त्यानंतर लखनौने विजयी धाव काढून सामना जिंकला. RCBच्या पराभवाला हर्षलची चूक जबाबदार असल्याची चर्चा सुरू असताना भारताचा फिरकीपटू आर अश्विन याने हर्षलचे कौतुक केले आहे.  

२१३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना लखनौची सुरुवात काही खास झाली नाही. पण, मार्कस स्टॉयनिस आणि निकोलस पूरन यांनी वादळी खेळी करताना सामना चुरशीचा बनवला. आयुष बदोनीने अखेरच्या षटकापर्यंत किल्ला लढवला, परंतु तो सुपला शॉट मारून षटकार खेचण्याच्या प्रयत्नात हिट विकेट झाला. जयदेव उनाडकटने २ चेंडूंत १ धाव हवी असाताना विकेट फेकली अन् १ चेंडू १ धाव अशी मॅच झाली. आवेश खान स्ट्राईकवर होता आणि रवी बिश्नोई नॉन स्ट्रायकर एंडला होता. काहीकरून बिश्नोई चेंडू पडण्याआधी क्रिज सोडेल याची कल्पना हर्षलला होती आणि त्याने स्टम्पजवळ येताच त्याला रन आऊट करण्याचा प्रयत्न केला. पण, त्याला बेल्स पाडता आल्या नाहीत.

हर्षलने टाकलेला अखेरचा चेंडू आवेशला मारता आला नाही आणि तो यष्टिरक्षक दिनेश कार्तिककडे गेला. कार्तिक चेंडू पकडून थ्रो करेपर्यंत आवेशने एक धाव पूर्ण केली आणि RCB ने मॅच गमावली. अश्विनने २०१९मध्ये जॉस बटलरला मंकडिंग करून रन आऊट केले होते आणि तेव्हा प्रचंड वाद झाला होता. हर्षलनेही काल असाच प्रयत्न केला, पण तो फसला. ''एक चेंडू एक धावेची गरज... नॉन स्ट्रायकरवरील फलंदाज नेहमीच धाव घेण्यासाठी आधी क्रिज सोडतात. मी प्रत्येक वेळी फलंदाजाला रोखतो आणि आऊट करतो. त्यात मला काहीच चुकीचं वाटत नाही,''असे अश्विन म्हणाला. 

तो पुढे म्हणाला, मी सामना पाहतच होतो आणि बायकोला म्हणालो त्याने फलंदाजाला रन आऊट करायला हवं आणि त्याने ते केलेही. गोलंदाजाचं हे धाडस पाहून मला आनंद झाला. असं जास्तीतजास्त गोलंदाजांनी करायला हवं, ही माझी इच्छा आहे. 

 

टॅग्स :आयपीएल २०२३रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरआर अश्विन
Open in App