IPL 2023, Sunrisers Hyderabad vs Kolkata Knight Riders Live Marathi : सनरायझर्स हैदराबादने इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध चुरशीच्या लढतीत हार मानावी लागली. आज पराभवाचा सामना करावा लागल्याने SRHचेही स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे. कोलकाता नाइट रायडर्सही त्याच नावेवर स्वार आहे, फक्त आजच्या विजयाने त्यांना आशेचा किरण दाखवला आहे. वरुण चक्रवर्थीने २०वे षटक अप्रतिम टाकले अन् KKRने रोमहर्षक विजयाची नोंद केली.
मयांक अग्रवाल आज चांगल्या फॉर्मात दिसत होता, परंतु १८ धावांवर हर्षित राणाने अप्रतिम बाऊन्सर टाकून त्याला बाद केले. शार्दूल ठाकूरने SRHचा दुसरा सलामीवीर अभिषेक शर्मा ( ९) याला बाद करून KKRला मोठे यश मिळवून दिले. राहुल त्रिपाठी इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानावर आला. पॉवर प्लेच्या शेवटच्या षटकात आंद्रे रसेलच्या गोलंदाजीवर त्रिपाठीने ५nb,६,४ अशा धावा चोपल्या, परंतु तिसऱ्या चेंडूवर मारलेला स्वीप फसला. अरोराने सीमारेषेवर त्याचा झेल टिपला. त्रिपाठी ९ चेंडूंत २० धावा करून माघारी परतला. इम्पॅक्ट प्लेअर अनुकूल रॉयने ७व्या षटकात हॅरी ब्रूकला ( ०) पायचीत केले. KKR ने घेतलेला DRS योग्य ठरला. अनुकूलने टाकलेल्या ११व्या षटकात एडन मार्कराम व हेनरिच क्लासेन यांनी दोन खणखणीत षटकार खेचत १५ धावा जोडल्या.
SRHसमोर ५४ चेंडूंत ८२ धावा करण्याचे आव्हान होते आणि मार्कराम व क्लासेन यांनी ३७ चेंडूंत ५० धावांची भागीदारी पूर्ण केली. दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज चांगली फटकेबाजी करताना दिसल्याने SRHच्या आशा उंचावल्या होत्या. ही जोडी तोडण्यासाठी शार्दूल ठाकूरला पुन्हा गोलंदाजीला आणले आणि त्याने कमाल केली. क्लासेन २० चेंडूंत ३६ धावांवर रसेलच्या हाती झेल देऊन माघारी परतला अन् मार्करामसोबतची ७० धावांची ( ४७ चेंडू) भागीदारी संपुष्टात आली. तरीही शार्दूलच्या त्या षटकात १० धावा करून हैदराबादने मॅच ३० चेंडू ३८ धावा अशी जवळ आणली.
तत्पूर्वी, KKRच्या फलंदाजांनी पुन्हा निराश केले. रिंकू सिंगने ( Rinku Singh) एकट्याने खिंड लढवताना सन्मानजनक पल्ला गाठून दिला. रहमानुल्लाह गुरबाज ( ०) व वेंकटेश अय्यर ( ७) हे दुसऱ्या षटकात मार्को यान्सनेच्या गोलंदाजीवर माघारी परतले. कार्तिक त्यागीने जेसन रॉयची ( २०) विकेट मिळवून दिली. रिंकू सिंग आणि कर्णधार नितीश राणा ( ४२) यांनी ६१ धावांची भागीदारी करताना KKRला रुळावर आणले. आंद्रे रसेल ( २४) माघारी परतल्यानंतर रिंकूने खिंड लढवली. त्याने ४६ धावा केल्या आणि कोलकाताला ९ बाद १७१ धावांवर पोहोचवले.