Join us

Abdul Samad, IPL 2023: 'पुढचं पाऊल' राजस्थानला नडलं... 'नो बॉल' पडला अन् हैदराबादने मिळवला नाट्यमय विजय

Abdul Samad Sandeep Sharma No ball, IPL 2023: शेवटच्या चेंडूवर हैदराबादने राजस्थानला पाजलं पराभवाचं पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2023 23:18 IST

Open in App

Abdul Samad Sandeep Sharma No ball, IPL 2023 RR vs SRH: राजस्थान विरूद्धच्या सामन्यात अखेरच्या चेंडूवर षटकार खेचत हैदराबादने नाट्यमय विजय मिळवला. संदीप शर्माच्या ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर ५ धावा हव्या असताना अब्दुल समद झेलबाद झाला, पण तो चेंडू नो बॉल पडला. रेषेच्या पुढे पडलेलं पाऊल राजस्थानला नडलं. त्यानंतर एका चेंडूत ४ धावा हव्या असताना, SRH ने सिक्सर मारून विजय साजरा केला. त्याआधी जोश बटलरच्या ९५ आणि संजू सॅमसनच्या नाबाद ६६ धावांच्या जोरावर राजस्थानने २ बाद २१४ धावांपर्यंत मजल मारली होती. हे आव्हान हैदराबादने शेवटच्या षटकात पूर्ण केले.

--

राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर यशस्वी जैस्वालने १८ चेंडूत ३५ धावा केल्या. त्याने ५ चौकार आणि २ षटकार लगावले. त्यानंतर संजू सॅमसन आणि जोस बटलर या जोडीने १३८ धावांची भागीदारी केली. बटलरने ३२ चेंडूत अर्धशतक केले. त्यानंतर त्याची शतकाकडे वाटचाल सुरू होती. पण भुवनेश्वर कुमारने त्याला पायचीत केले. बटलरने १० चौकार आणि ४ षटकारांच्या साथीने ५९ चेंडूत ९५ धावा केल्या. बटलर बाद झाल्यावर संजू सॅमसनने अर्धशतक पूर्ण केले. संजूने ३८ चेंडूत नाबाद ६६ धावा केल्या. त्यात त्याने ४ चौकार आणि ५ षटकार लगावले आणि संघाला २० षटकात २१४ धावांपर्यंत पोहोचवले. सवाई मानसिंग स्टेडियम वरील ही आतापर्यंतची सर्वात मोठी टी२० धावसंख्या ठरली.

२१५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना, हैदराबादने चांगली सुरूवात केली. सलामीवीर अनमोलप्रीत सिंगने २५ चेंडूत ४ चौकार आणि १ षटकर खेचत ३३ धावा केल्या. त्यानंतर अभिषेक शर्मा आणि राहुल त्रिपाठी जोडीने ६५ धावांची भागीदारी केली. अभिषेक शर्माने अर्धशतक ठोकले पण त्यानंतर लगेचच तो बाद झाला. त्याने ३४ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकार खेचत ५५ धावा केल्या. राहुल त्रिपाठीचं अर्धशतक हुकलं. त्याने २९ चेंडूत २ चौकार आणि ३ षटकार खेचत ४७ धावा केल्या. हेनरिक क्लासेन १२ चेंडूत २ चौकार २ षटकार खेचून २६ धावांवर बाद झाला. त्यानंतर १२ चेंडूत ४१ धावांची गरज होती. त्यावेळी ग्लेन फिलिप्सने ७ चेंडूत २५ धावा केल्या. त्याने ३ षटकार आणि १ चौकार लगावला. सामना त्यानंतरही शेवटच्या चेंडूपर्यंत पोहोचला. त्यावेळी संदीप शर्माने नो बॉल टाकला. त्यामुळे हैदराबादला संधी मिळाली आणि अब्दुल समदने षटकार मारून सामना जिंकला.

टॅग्स :आयपीएल २०२३राजस्थान रॉयल्ससनरायझर्स हैदराबाद
Open in App