IPL 2023, Royal Challengers Banglore vs Kolkata Knight Riders Live Marathi : कोलकाता नाइट रायडर्सच्या २०१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा डाव गडगडला. पॉवर प्लेमध्ये RCBचे तीन फलंदाज माघारी परतल्यानंतर विराट कोहलीने ( Virat Kohli) चांगला खेळ केला. आयपीएल २०२३मधले पाचवे अर्धशतक त्याने झळकावले आणि ३००+ धावा करणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला. यासह विराटने आज वर्ल्ड रेकॉर्डची नोंद केली आणि हे पाहून अनुष्का शर्माच्या गालावरची कळी फुलली.
जेसन रॉय व एन जगदीशन ( २७) यांनी ८३ धावांची भागीदारी केली. RCBच्या खेळाडूंनी क्षेत्ररक्षणात केलेल्या चुका KKRच्या पथ्यावर पडल्या. कर्णधार नितीश राणाचे ३ सोपे झेल RCBच्या खेळाडूंनी रापले. याचा पुरेपूर फायदा नितीशने उचलताना २० चेंडूंत ४८ धावा चोपल्या. वनिंदू हसरंगाने १८व्या षटकात दोन महत्त्वाच्या विकेट्स घेत RCBला पुनरागमन करून दिले. तरीही KKRने चांगले लक्ष्य उभे केले. जेसन २९ चेंडूंत ४ चौकार व ५ षटकारांसह ५६ धावांवर बाद झाला. वैशाख विजयकुमारने ४-०-४१-२ अशी स्पेल फेकली. वनिंदूने २४ धावांत २ विकेट्स घेतल्या. वेंकटेश अय्यर ३१ धावांवर बाद झाला. रिंकू सिंग ( १८*) आणि डेव्हिड विसे ( १२*) यांनी शेवटच्या षटकात चांगले फटके मारताना KKRला ५ बाद २०० धावा उभारून दिल्या.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"