IPL 2023, Royal Challengers Bangalore vs Gujarat Titans Live : फॅफ ड्यू प्लेसिस आणि विराट कोहली यांनी पुन्हा एकदा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला दमदार सुरुवात करून दिली. या दोघांनी यंदाच्या पर्वात ९३९ धावांची भागीदारी केली आहे आणि २०१६ मध्ये विराट व एबी डिव्हिलियर्स यांच्या सर्वाधिक ९३९ धावांच्या विक्रमाशी आज बरोबरी झाली. पण, गुजरात टायटन्सने ६७ धावांवर RCBला पहिला धक्का दिला अन् त्यानंतर विकेट्स पटापट पडल्या. विराटने एका बाजूने खिंड लढवताना आणखी एक शतक झळकावून GT समोर तगडे लक्ष्य उभे केले.
GT ने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला, परंतु पुन्हा पाऊस सुरू झाल्याने २५ मिनिटे विलंब झाला. विराट कोहली आणि फॅफ ड्यू प्लेसिस यांनी पुन्हा दमदार सुरूवात करून दिली. या दोघांच्या ४३ चेंडूंत ६७ धावांच्या भागीदारीला आठव्या षटकात नूर अहमदने ब्रेक लावला. फॅफ ( २८) स्टम्प सोडून फटका मारायला गेला अन् चेंडू बॅटला घासून यष्टिरक्षक वृद्धीमान साहाच्या पॅडवर आदळून स्लीपमध्ये उभ्या असलेल्या राहुल तेवातियाच्या हाती विसावला. राशीद खानने RCBची दुसरी विकेट घेताना ग्लेन मॅक्सवेलचा ( ११) दांडा उडवला. नूरने त्याच्या पुढच्या षटकात महिपाल लोमरोरला ( १) माघारी पाठवले. साहाने अप्रतिम स्टम्पिंग केला.
विराट कोहली-फॅफ ड्यू प्लेसिस जोडीने इतिहास रचला, आयपीएल २०२३चा हंगाम गाजवला
विराटने ६० चेंडूंत आयपीएल २०२३ मधील दुसरे शतक पूर्ण केले. ट्वेंटी-२० क्रिकेटमधील हे त्याचे ८वे शतक ठरले अन् त्याने आयपीएलमध्ये सर्वाधिक ७ शतकांचा विक्रम करताना ख्रिस गेलचा मोठा विक्रम मोडला. विराटने ६० चेंडूंत १३ चौकार व १ षटकारासह १०० धावा पूर्ण केल्या. RCB ने ५ षटकांत १९७ धावा केल्या. अनुज रावतनेही ( २३) विराटसह ६४ धावा जोडल्या. विराट १०१ धावांवर नाबाद राहिला.