IPL 2023, Punjab Kings vs Delhi Capitals Live Marathi : प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद झालेल्या दिल्ली कॅपिटल्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये मोठा अपसेट नोंदवला. २१३ धावांचा डोंगर उभारल्यानंतर DCच्या गोलंदाजांनी पंजाब किंग्सला सुरुवातीलाच धक्के दिले. क्षेत्ररक्षणात त्यांच्याकडून झालेल्या चुका DCला महागात पडल्या असत्या, परंतु नशीबाने आज त्यांची साथ दिली. लिएम लिव्हिंगस्टोन आणि अथर्व तायडे यांना प्रत्येकी एक झेल व एक रन आऊट करण्याची संधी DCने गमावलेली. लिव्हिंगस्टोनने त्याचाच फायदा उचलताना अखेरपर्यंत DCला तव्यावर ठेवले होते, परंतु दुसऱ्या बाजूने त्याला साथ न मिळाल्याने पंजाबचा पराभव झाला. लिव्हिंगस्टोन ९४ धावांवर झेलबाद झाला.
इशांत शर्माने त्याच्या पहिल्याच षटकात शिखर धवनची ( ०) विकेट घेतली आणि प्रभसिमरन सिंगला ( २२) अक्षर पटेलने बाद केले. लिएम लिव्हिंगस्टोन व अथर्व तायडे यांचा प्रत्येकी एक झेल अन् प्रत्येकी रन आऊट करण्याची संधी दिल्लीच्या खेळाडूंनी गमावली. हे दोन्ही झेल कुलदीप यादवच्या षटकात सोडले गेले आणि अशी फिल्डिंग पाहून कोच रिकी पाँटिंग संतापले. १० षटकांत पंजाबच्या २ बाद ७२ धावा झालेल्या आणि त्यांना अखेरच्या ६० चेंडूंत १३९ धावा करायच्या होत्या. एवढे जीवदान मिळाल्यानंतर PBKSचे खेळाडू सुसाट सुटले आणि दोघांनी अर्धशतक झळकावले. ४२ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह ५५ धावा करणारा अथर्व १५व्या षटकात रिटायर्ड हर्ट झाला. त्याने लिव्हिंगस्टोनसह ५० चेंडूंत ७८ धावा जोडल्या.
तत्पूर्वी, डेव्हिड वॉर्नर ( ४६) व पृथ्वी शॉ ( ५४) यांच्या फटकेबाजीनंतर रायली रूसोचे वादळ धर्मशालावर घोंगावले आणि त्याला फिल सॉल्टची मदत मिळाली. पृथ्वीने वॉर्नरसह ९४ धावा चोपल्या. त्यानंतर रूसो आणि पृथ्वी यांनीही २८ चेंडूंत ५८ धावांची भागीदारी केली. रूसो व सॉल्ट यांनी ३० चेंडूंत ६५ धावा केल्या. रूसोने ३७ चेंडूंत ६ चौकार व ६ षटकारांसह नाबाद ८२ धावा केल्या. सॉल्ट नाबाद २६ धावा केल्या आणि दिल्लीने २० षटकांत २ बाद २१३ धावांचा डोंगर उभा केला.