IPL 2023, MS Dhoni : माजी विजेत्या चेन्नई सुपर किंग्सला इंडियन प्रीमिअर लीग २०२३ च्या पहिल्या सामन्यात गतविजेत्य गुजरात टायटन्सकडून हार पत्करावी लागली. ऋतुराज गायकवाडच्या ९२ धावांच्या खेळीच्या जोरावर CSK ने १७८ धावा केल्या आणि गुजरातने शुबमन गिलचे अर्धशतक व अन्य खेळाडूंच्या योगदानाच्या जोरावर ५ विकेट्स राखून सामना जिंकला. या सामन्यात गुजरातला मोठा धक्का बसला आणि केन विलियम्सनला क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाली. आयपीएलच्या उर्वरित सामन्यांत त्याचे खेळणे अनिश्चित वाटत आहे. त्यात CSKचीही चिंता वाढवणारी घटना कालच्या सामन्यात घडली. CSK चा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याला दुखापत झाल्याचे सर्वांनी पाहिले आणि तो लंगडताना दिसला.
दीपक चहरने वाईडच्या दिशेने चेंडू टाकला होता तो अडवण्यासाठी धोनीने डाईव्ह मारली. त्यानंतर तो लंगडताना दिसला. धोनीच्या उजव्या पायाच्या गुडघ्याला दुखापत झाल्याचे दिसल्याने चाहत्यांची धाकधुक वाढली आहे. गुजरात टायटन्सविरुद्धच्या लढतीपूर्वीही धोनी खेळणार नाही अशी चर्चा रंगली होती. सराव सत्रात धोनीच्या गुडघ्याला मार लागल्याचे वृत्त होते, पण तो मैदानावर उतरला. पण, प्रत्यक्ष सामन्यात क्षेत्ररक्षण करताना त्याचा गुडघा दुखावल्याचे दिसले. फिजीओंनी प्राथमिक उपचार केल्यानंतर धोनी पुन्हा यष्टिंमागे उभा राहिला. चेन्नईचा ३ एप्रिलला लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध सामना होणार आहे. त्यात धोनी खेळणार की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"