IPL 2023, Lucknow Super Giants vs Chennai Super Kings Live Marathi : चेन्नई सुपर किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यातला सामना पावसामुळे रद्द करावा लागला आहे. CSK च्या फिरकीपटूंनी खेळपट्टीचा पुरेपूर उपयोग करताना LSG चा निम्मा संघ ४४ धावांत माघारी पाठवला होता. निकोलस पूरन व आयुष बदोनी यांची अर्धशतकी भागीदारी सामन्याला कलाटणी देणारी ठरली. आयुषने वैयक्तिक अर्धशतक झळकावले आणि संघाला १९.२ षटकांत ७ बाद १२५ धावांपर्यंत पोहोचवले. मात्र पावसाच्या हजेरीमुळे ही मॅच बराच वेळ थांबली होती आणि अखेर ७ वाजता ती रद्द करण्याचा निर्णय घेतला गेला. त्यामुळे दोन्ही संघांना १-१ गुणावर समाधान मानावे लागले.
७.२८ पर्यंत सामना सुरू न झाल्यास दोन्ही संघांना प्रत्येकी १-१ गुण दिले जाणार होते आणि त्याआधी जर सामना सुरू झालाच तर तो ५-५ षटकांचा होणार होता. पण, सात वाजता पावसाचा अंदाज घेऊन ही मॅच रद्द करण्याचा निर्णय घेतला गेला आणि दोन्ही संघांना प्रत्येकी १-१ गुण दिले गेले. गुजरात टायटन्स १२ गुणांसह अव्वल स्थानावर आहे आणि आजच्या सामन्यानंतर लखनौ व चेन्नई हे संघ प्रत्येकी ११ गुणांसह अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आले आहेत. राजस्थान रॉयल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्स हे प्रत्येकी १० गुण असलेले संघ मागे गेले आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"