Join us

IPL 2023 : पंजाबविरूद्धच्या विजयानंतर पांड्याला BCCI कडून मोठा धक्का; भरावी लागणार मोठी रक्कम

 GT Vs PBKS : आयपीएलच्या १६व्या हंगामातील अठरावा सामना पंजाब किंग्ज आणि गतविजेत्या गुजरात टायटन्स यांच्यात झाला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2023 13:54 IST

Open in App

hardik pandya fine । मोहाली : आयपीएलच्या १६व्या (IPL 2023) हंगामातील अठरावा सामना पंजाब किंग्ज आणि गतविजेत्या गुजरात टायटन्स (GT vs PBKS) यांच्यात झाला. अखेरच्या षटकांपर्यंत रंगलेल्या या सामन्यात हार्दिक पांड्याच्या गुजरातने ६ गडी आणि १ चेंडू राखून विजय मिळवला. मात्र, या विजयानंतर गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याच्या अडचणीत वाढ झाली आहे. वेळेत षटके न टाकल्यामुळे गुजरात टायटन्सच्या संघाला दंड आकारला गेला आहे. त्यामुळे कर्णधार हार्दिक पांड्याला नियमानुसार १२ लाख रूपये भरावे लागणार आहेत. हार्दिक सामन्यादरम्यान धिम्या गतीने षटके टाकल्याप्रकरणी दोषी आढळला आहे.

पांड्याला BCCI कडून मोठा धक्काआयपीएलच्या नियमांनुसार, आयपीएलमधील एक सामना ३ तास आणि २० मिनिटांत संपणे आवश्यक आहे. पण षटके वेळेत न टाकल्यामुळे कालचा सामना लांबला. पांड्याच्या संघाने पंजाबविरूद्ध विजय मिळवला पण स्लो ओव्हर रेटिंगप्रकरणी आता दंड भरावा लागणार आहे. हार्दिकबद्दल भाष्य करायचे झाले तर, आयपीएलच्या आचार संहितेनुसार त्याची या हंगामातील ही पहिलीच चूक आहे. त्यामुळे त्याला १२ लाख रूपये मोजावे लागणार आहेत. गुजरात टायटन्सने पंजाब किंग्जचा त्यांच्याच घरात पराभव करून गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. या आधी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिस आणि राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन यांच्यावर ही कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे यंदाच्या हंगामात दंड भरणारा हार्दिक तिसरा कर्णधार ठरला आहे. 

मोहालीत काल झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पंजाबने ८ गडी गमावून १५३ धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरात टायटन्सच्या संघाने १९.५ षटकांत ४ गडी गमावून लक्ष्य गाठले. खरं तर कमी धावसंख्या असतानाही पंजाबच्या गोलंदाजांनी कमाल करून सामन्यात रंगत आणली. पण राहुल तेवतिया पुन्हा एकदा महत्त्वाच्या क्षणी गोलंदाजासाठी काळ ठरला. तेवतियाने २ चेंडूत केलेल्या ५ धावांनी गुजरातच्या विजयावर शिक्कामोर्तब झाला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

टॅग्स :आयपीएल २०२३गुजरात टायटन्सहार्दिक पांड्यापंजाब किंग्सबीसीसीआय
Open in App