IPL 2023 Final Gujarat Titans vs Chennai Super Kings Live marathi : महेंद्रसिंग धोनीने ( MS Dhoni) पाचव्यांदा इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेत जेतेपदाचा चषक उंचावला. मुंबई इंडियन्सनंतर आयपीएलची पाच जेतेपदं नावावर असलेला CSK दुसरा संघ ठरला आहे. गुजरात टायटन्सने २१५ धावांचे तगडे लक्ष्य ठेवले होते, परंतु पावसाच्या व्यत्ययामुळे CSK समोर १५ षटकांत १७१ धावांचे सुधारित लक्ष्य ठेवले गेले. CSKच्या आघाडीच्या फलंदाजांनी सुरुवातही दणक्यात करून दिली, परंतु GTचे हुकमी एक्के नूर अहमद व मोहित शर्मा यांनी मॅच फिरवली होती. पण,  रवींद्र जडेजाने दोन चेंडूंत मॅच फिरवली. २०१०, २०११, २०१८, २०२१ आणि २०२३ अशी ५ जेतेपदं धोनीच्या नावावर झाली आहेत. 
ऋतुराज गायकवाड ( २६)  व डेव्हॉन कॉनवे ( ४७) यांनी खणखणीत फटके खेचताना पहिल्या विकेटसाठी ७४ धावा जोडल्या. नूर अहमदने एकाच षटकात दोघांनाही बाद केले. अजिंक्य रहाणेने १३ चेंडूंत २ चौकार व २ षटकारांसह २७ धावा करून दडपण हलके केले. राशीद खानच्या तिसऱ्या षटकाचे शेवटचे दोन चेंडू शिवम दुबेने षटकार खेचून सामन्यात रंगत आणली. शेवटची आयपीएल खेळणाऱ्या अंबाती रायुडूने ८ चेंडूंत १९ धावा केल्या. MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बाद झाला. मोहित शर्माने सलग दोन धक्के देऊन सामन्याची चुरस वाढवली.  चेंडू १३ धावा अशी मॅच आली. शिवमने पहिल्या ४ चेंडूंत केवळ तीन धावा केल्या आणि २ चेंडूंत १० धावा आल्या. जडेजाने षटकार व चौकार खेचून मॅच जिंकून दिली. 
सामन्यानंतर जडेजा म्हणाला, माझ्या घरच्या प्रेक्षकांसमोर पाचवे विजेतेपद जिंकून आनंद वाटतोय. मी गुजरातचा आहे आणि ही एक विशेष भावना आहे. ही गर्दी आश्चर्यकारक आहे. ते रात्री उशिरापर्यंत पाऊस थांबण्याची वाट पाहत होते, पाठिंबा देण्यासाठी आलेल्या CSK चाहत्यांचे मी खूप अभिनंदन करू इच्छितो. मी हा विजय CSK संघाच्या खास सदस्य MS Dhoniला  समर्पित करू इच्छितो. मी स्वत:ला पाठीशी घालत होतो आणि सरळ फटकेबाजी करू पाहत होतो, कारण मला माहित आहे की मोहित हे हळू चेंडू टाकू शकतो.