आयपीएलच्या प्रत्येक सत्रात ज्याप्रकारे विजेत्या संघाची उत्सुकता असते, तीच उत्सुकता ऑरेंज कॅप पटकावणाऱ्या फलंदाजाच्या बाबतीत असते. स्पर्धेत सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजाला ऑरेंज कॅपने सन्मानित करण्यात येते. ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू शॉन मार्श हा ऑरेंज कॅप पटकावणारा पहिला फलंदाज ठरला होता. तसेच आतापर्यंत ऑस्ट्रेलियाच्याच डेव्हिड वॉर्नरने सर्वाधिक तीनवेळा ऑरेंज कॅप जिंकली आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर ऑरेंज कॅपवर कब्जा करणारा पहिला भारतीय ठरला. त्याने २०१० मध्ये ही मानाची कॅप पटकावली होती.
२०२२ ला काेण मारणार बाजी?
यंदाच्या सत्रात संभाव्य ऑरेंज कॅप विजेता म्हणून एकूण १० फलंदाजांना आघाडीवर मानले जात आहे. यामध्ये केवळ २ फलंदाज विदेशी असून, उर्वरित ८ फलंदाज भारतीय आहेत.
यामध्ये विराट कोहली, रोहित शर्मा, ऋतुराज गायकवाड, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, शिखर धवन, शुभमन गिल आणि संजू सॅमसन या भारतीयांचा समावेश आहे. या सर्वांना डेव्हिड वॉर्नर आणि केन विलियम्सन या दोन विदेशी फलंदाजांकडून कडवी टक्कर मिळू शकते.